डोळ्यात मिर्चीपूड टाकून लुटण्याचा प्रयत्न; सराफा कामगाराने थेट गाठले पोलिस ठाणे

डोळ्यात मिर्चीपूड टाकून लुटण्याचा प्रयत्न; सराफा कामगाराने थेट गाठले पोलिस ठाणे

नाशिक : सीबीएस परिसरात चांदी लुटीची घटना ताजी असतानाच गंगापूररोडवर सराफ दुकानातील कामगारांना रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रकार रविवारी (दि. २५) रात्री ९.३० वाजता घडला. कर्मचार्‍यांनी थेट सरकारवाडा पोलीस ठाणे गाठल्याने लुटारू पळून गेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओढेकर ज्वेलर्सचे व्यवस्थापक विनोद कटारिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जुना गंगापूर नाका येथे ओढेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. दुकानातील व्यवस्थापक विनोद धनजीभाई कटोरिया (वय ४३, रा. जेलरोड, नाशिक) व कामगार विजय वावरे (वय ३४, रा.जुने नाशिक) हे रविवारी रात्री ९.३० वाजता दुकानातील रक्कम घेऊन दुचाकीने जात होते. त्यावेळी विद्या विकास सर्कलकडून आलेल्या दोन संशयितांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला.

शंकराचार्य संकुल येथे संशयितांनी दोघा कामगारांना अडवले. त्यांना शिवीगाळ करत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. कर्मचार्‍यांना संशय आल्याने दोघांनी प्रतिकार केला. संशयितांनी दोघांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. कटारिया यांनी गाडी न थांबवता निघाले. त्यांनी थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे संशयितांनी दोघांचा पाठलाग करणे सोडून पलायन केले.घटनेची माहिती मिळताच दुकानमालक हर्षवर्धन ओढेकर हे पोलीस ठाण्यात आले.

First Published on: September 28, 2022 2:12 PM
Exit mobile version