चांदीच्या नॅनो गुढीला नाशिककरांची पसंती

चांदीच्या नॅनो गुढीला नाशिककरांची पसंती

नाशिक । साडेतीन मुहूतपैकी एक असलेल्या गुढी पाडव्यासाठी सराफ व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा सोन्या-चांदीमुळे गुढीला नवीन रूप मिळाले आहे. सराफ बाजारात महिलांसाठी खास नॅनो गुढी विक्रीसाठी आलेल्या आहेत. ५० ग्रॅम चांदीची गुढीची किंमत पाचशे रुपये असून, ५०० ग्रॅमची गुढी ५० हजारांपर्यंत उपलब्ध आहे. चांदीची नॅनो गुढी ग्राहकांच्या पसंतीस उतरली असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

अनेकजण गुढीपाडव्यानिमित्त पूजेसह नवदाम्पत्याला भेट, जावयाला वाण देण्यासाठी सोन्या-चांदीची गुढी खरेदी करतात. यंदा सराफांकडे चांदीच्या गुढींची विक्री सुरू झाली असून, गुढीच्या डिझाईनमध्ये बदल करून त्या आकर्षक स्वरुपात बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. वेळूची काठी, रेशीम, मलमलचे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, गाठीची माळ सोबत झेंडूच्या फुलांचा हार वापरून गुढी तयार केली जाते. या पारंपरिक गुढीव्यतिरिक्त आता चांदीची काठी, गुढीला लावण्याचा तांब्या, सोबत कलश आणि गाठीची माळ म्हणून चांदीची चेन असा स्वतंत्र सेटच तयार करण्यात आला आहे. नवीन वर्षात गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या वस्तू आप्तेष्ठांना भेट म्हणून दिल्या जातात. यंदा सराफ व्यावसायिकांकडून विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.

सोन्या व चांदीच्या गुढ्या ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करण्यात आल्या आहेत. चांदीची गुढी बनविताना नवीन डिझाईन तयार केली आहे. ग्राहकांचा या संकल्पनेला प्रतिसाद लाभतो आहे.
– गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

 

ग्राहकांची नॅनो गुढीला पसंती मिळत आहे. पाचशेपासून ५० हजारपर्यंत चांदीची गुढी विक्री होत आहे.
चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

First Published on: April 8, 2024 11:58 PM
Exit mobile version