नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके तर्फे चांदवड, देवळ्यात 23 ट्रॅक्टरचा लिलाव

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके तर्फे चांदवड, देवळ्यात 23 ट्रॅक्टरचा लिलाव

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं धडक वसूली मोहिम हाती घेतलीय. यात आज चांदवड व देवळा तालुक्यातील २३  ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात आला. या लिलावातून बँकेची ८१  लाख ६३  हजार रुपयांची वसूली झाली.

गेल्या महिन्याभरापासून बँकेनं थकबाकीदारांच्या वाहनांचा लिलाव सुरु केलाय. नाशिकमधील मुख्यालयात जाहीर लिलाव झाल्यानंतर सटाणा येथील २१  ट्रॅक्टरचा लिलाव केला होता. आज चांदवडला १०  ट्रॅक्टर तर देवळ्याला १०  ट्रॅक्टर जप्त केलेत. त्यांचा जाहीर लिलाव करुन बँकेनं ही रक्कम वसूल केली. ज्या कर्जदारांनी १० ते १५  वर्षांपासून कर्ज परतफेड केलेली नाही, त्यांच्याविरोधात ही मोहिम राबवली जात आहे.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करत वसुलीला प्रारंभ केलेला असताना विभागीय सहनिंबधक ज्योती लाटकर यांनी वसुलीसाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश बँक निरीक्षकांसह तालुका निंबधकांना दिल्या.

विभागीय सहनिंबधक लाटकर यांनी शुक्रवारी (दि.११) जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हयातील सर्व तालुक्यातील विभागीय अधिकारी यांच्या वसुली बाबत आढावा बैठक घेऊन कर्जवसुलीसाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदावर सर्व कायदेशीर बाबीची पुर्तता करून थकबाकी कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास आदेश त्यांनी यावेळी दिले. लिलाव प्रक्रिया राबविणे थकबाकीदार प्रभावशाली थकबाकीदाराकडून वसुली करण्याच्या सूचना विभागीय सहनिंबधक यांनी यावेळी दिल्या. बिगरशेती थकबाकीदारांवर कारवाई करतांना जप्त केलेल्या वाहन असो की, मालमत्ता यांचे मुल्याकंन करून पुढील कारवाई करण्याबाबतही त्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

First Published on: February 12, 2022 8:15 AM
Exit mobile version