रिक्षा परमीट घ्या अन् भाड्याने द्या

रिक्षा परमीट घ्या अन् भाड्याने द्या

रिक्षाचालक

प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुशिक्षित बेरोजगारांनी रिक्षा चालवण्याचे परमिट घेतलेले आहे, त्यांनी हे परमिट ज्यांच्याकडे रिक्षा आहे, त्यांना वार्षिक भाडे तत्वावर वापरण्यास दिलेले आहे. ज्यांनी हे परमिट स्वतःच्या रिक्षासाठी वापरणे अपेक्षित असताना त्या रिक्षामालकांनीही ज्या व्यक्तीकडे बिल्ला आहे, अशा युवकांना आपली रिक्षा शिलकीवर चालवण्यास देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

नाशिक शहरात सुमारे 27 हजार परमिटधारक असल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये आहे. मात्र, यापेक्षा अधिक रिक्षा शहरातील मार्गावर धावतात. रिक्षांना स्टँड अपुरे आहेत. रिक्षाचालकांकडून प्रवाशांबरोबर गैरवर्तन, बेशिस्त रिक्षाचालक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. मात्र, जे रिक्षाचालक स्वतः परमिटधारक, रिक्षाचालन परवाना आणि बिल्लाधारक आहेत, त्यांच्याकडून वाहतुकीचे नियम, गणवेश, प्रवाशांबरोबर सौजन्यपूूर्ण वर्तन असते. त्यामुळे सर्वच रिक्षाचालक सारखेच नसतात, असे प्रवाशीही नमूद करतात, पण परमिट एकाचे रिक्षा दुसर्‍याची आणि चालक तिसराच अशी साखळीही शहरात असल्याने यामुळे रिक्षा व्यवसायात गुन्हेगारीचा शिरकाव झालेला आहे. त्यात इमानदारीने रिक्षाचालवणारेही गोवले जात आहेत. याकडे ‘आरटीओ’चे दुर्लक्ष का, असा प्रश्न विचारला जात आहे.

परमिट भाडेतत्वावर देण्यासाठी एक ते तीन वर्षाचा करार केला जातो. त्यात 10 ते 30 हजार रुपये वार्षिक भाडे आकारणी केले जाते. रिक्षामालक 100 रुपयांच्या बॉन्डवर भाडेततत्वाचे प्रतिज्ञापत्र करून करार करून घेतो. पण ही प्रक्रिया करून तो रिक्षामालकही स्वतः रिक्षा चालवत नाही, तर तिसर्‍या एखाद्या रिक्षाचालवण्याचा परवाना आणि बिल्ला असलेल्या तरुणांना ती रिक्षा आणि परमिट 200 ते 300 रुपये रोज शिलकीवर चालवण्यास देतो. त्यामुळे परमिटचा वापर प्रत्यक्षात स्वतःच्या रिक्षांसाठी करणार्‍यांची संख्या शहरात कमी असल्याचे बोलले जाते. जे परमिटधारक आहेत ते स्वतः दुसराच काही तरी व्यवसाय करतात, तर जे रिक्षामालक आहेत ते शिल्लकीवर रिक्षा देऊन उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करतात. तर ज्यांच्याकडे खरच रिक्षा चालवण्याचा परवाना आणि बिल्ला असतो, त्यात गरजवंत असतात. त्यांचे प्रमाण कमी आणि रिक्षाचालवण्यास उतावळे असलेले बेलगाम युवक अधिक असतात. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. 500 रुपये दंड आकारून रिक्षाधारकांना समज देऊन सोडून दिले जाते.

महिलांच्या परमिटचे काय?

शहरात रिक्षाचालवण्यासाठी महिलांनाही ‘आरटीओ’कडून परमिट वितरित करण्यात आलेले आहे. त्यानुसार शहरात किती महिला रिक्षाचालक म्हणून व्यवसाय करीत आहे, हे त्यांच्या नाममात्र संख्येवरून लक्षात यावे. जर त्या महिला रिक्षाचालवतच नाही तर मग, त्यांच्या परमिटचे काय झाले, त्यांचे परमीट कोणत्या रिक्षाचालकांकडे भाडेतत्व करारावर वापरण्यात गेले. हा प्रश्न आहे.

अशा रिक्षाचालकांवर कारवाई होईल

रिक्षा चालवण्याच्या व्यवसायाचे परमिट दूसर्‍या कोणाला भाडेतत्वावर दिले जात असेल आणि ही प्रक्रिया ‘आरटीओ’च्या नियमानुसार होत नसेल, तर ही कृती बेकायदेशीर आहे. अशा रिक्षाचालकांबाबत तक्रारी आल्या, तर कारवाई होईल. 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर परमिट ट्रान्स्फर ही प्रक्रिया नसून, त्यासाठी ‘आरटीओ’कडे विहित अर्जाचे नमुने आहेत. रितसर शुल्क भरून ही प्रक्रिया पूर्ण होते. – विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक.

First Published on: July 12, 2019 11:59 PM
Exit mobile version