नाशकात दुभाजकांची दूरावस्था; लोकप्रतिनिधींची डोळेझाक

नाशकात दुभाजकांची दूरावस्था; लोकप्रतिनिधींची डोळेझाक

हिरावाडी:नाशिक महापालिकेच्या तिजोरीतून नगरसेवक दरवर्षी लाखो रुपये रस्ते दुभाजक दुरुस्ती आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली खर्च करतात. मात्र, दुभाजक टिकवण्याची जबाबदारी कोणीही स्वीकारत नसल्याचे विदारक वास्तव शहरातील अनेक भागांत दिसून येत आहे.

नाशिक शहरातील प्रभाग-५ मध्ये मखमलाबाद नाका ते पेठ फाटा परिसरातील पेठकर प्लाझा इमारतसमोरील रस्त्याच्या दुभाजकातील जवळपास दोनशे ते तीनशे फुटांच्या लोखंडी जाळ्या चोरीला गेल्या आहेत. तशीच परिस्थिती पेठरोड भागातील लोखंडी दुभाजकांमधील असून, काही ठिकाणी संपूर्ण जाळ्या तर अनेक ठिकाणी जाळ्यांमधील लोखंडी पाईप चोरी गेल्याचे दिसून येत आहे. या चोरी गेलेल्या जाळ्यांमुळे परिसराची शोभा कुठेतरी बाधित होत आहे. पण या जाळ्या चोरीला कशा गेल्या? कधी चोरीला गेल्या? याचे कोणतेही देणे-घेणे हे प्रभागातील लोकप्रतिनिधींना आणि महापालिका प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. कारण, अजून महापालिकेकडून एकही शासकीय मालमत्तेची वस्तू चोरीला गेल्याबाबत पोलिसांत तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांचे अर्थचक्र तर यामागे दडलेले नाहीत ना. त्यामुळे महापालिकेकडून पोलीस ठाण्यात तक्रार किंवा गुन्हा दाखल केला जात नसावा. त्यामुळे भुरट्या चोरांना चोरी करण्याची संधी महापालिकेकडून दिली जात नाही ना असा, प्रश्न शहरातील सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.

First Published on: November 15, 2021 1:40 AM
Exit mobile version