सावधान, बालकांमध्येही वाढतोय कोरोना

सावधान, बालकांमध्येही वाढतोय कोरोना

कोरोनाचा प्रादुर्भाव ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिक वेगाने होतो असे आजवर बोलले जात होते. परंतु दुसर्‍या लाटेत २० टक्के बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बालकांसह पालकांनी सुरक्षीततेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबरमध्ये विक्रमी रुग्ण आढळून आले होते. दुसर्‍या लाटेत हा विक्रम मोडित निघाला आहे. २७ मार्च २०२१ रोजी नाशिक शहरात सर्वाधित २१८१ नवे बाधित आढळून आले. १ मार्च रोजी नाशिकमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८० हजार ७७६ इतकी होती. त्यापैकी ७७,६११ रुग्ण बरे झाले होते. २१२५ क्टीव्ह रुग्ण उपचार घेत होते. गेल्या महिनाभरात सुमारे ३० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. शहरातील कोरोना क्टीव्ह रुग्णसंख्येने १५ हजारांचा पल्ला पार केला आहे. नाशकातील कोरोना संसर्गाचा हा वेग राज्यात सर्वाधिक ठरत असून रुग्णांलयांमध्ये दाखल होण्यासाठी बेड शिल्लक न राहिल्याने रुग्णांची हेळसांड होवू लागली आहे.

या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र त्यानंतरही या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पहिल्या लाटेत लहान मुलांना कोरोना आजार होण्याचे प्रमाण कमी होते. परंतू दररोज आढळणार्‍या नव्या रुग्णांचे अवलोकन केले असता लहान मुलांमध्ये कोरोना आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक १० रुग्णांमागे दोन ते तीन बालके असल्याचे आढळून येत असल्याने हा आजार लहान मुलांसाठी देखील घातक ठरू लागली आहे. कोरोनाचे विषाणू लहान मुलांच्या हृदयावर तसेच मेंदूवर आघात करत असल्याचे वैद्यकीय निरिक्षणातून समोर आले असल्याची माहिती डॉ. कुटे यांनी दिली.

या नियमांचे करा पालन
l नाक आणि तोंड मास्कने व्यवस्थित झाकावे
l बोलताना मास्क काढू नये, खाली करू नये
l गर्दीमध्ये, बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे
l सोशल डिस्टन्सिंग म्हणजे दोन माणसांमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे
l कोरोनासारखी लक्षणे असतील तर ताबडतोब तपासणी करून घेणे
l कोरोना झाल्याचे आढळल्यास
आयसोलेट व्हावे
l घरातील इतर लोकांनीदेखील कोरोना तपासणी करावी

कोरोनाचा नवा स्ट्रेन तीव्र स्वरूपाचा, लवकर पसरणारा आणि मृत्यूचे प्रमाण वाढविणारा आहे. लहान मुलांसाठीही हा आजार प्राणघातक ठरु लागला आहे. सगळ्यांनी नियम पाळले तर कोरोनाची साथ नक्कीच आटोक्यात येईल.
डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

First Published on: March 29, 2021 9:53 PM
Exit mobile version