स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या गणेश गितेंची बिनविरोध निवड!

स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या गणेश गितेंची बिनविरोध निवड!

महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अखेर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गणेश गिते यांच्या नावावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बुधवारी ( दि. ८) शिक्कामोर्तब केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांनी हा निर्णय जाहीर केला. निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत महापालिका प्रशासनाला बुधवारी सकाळी प्राप्त झाली. सक्षम अधिकाऱ्यामार्फत निकाल जाहीर करण्याची सूचना न्यायालयाने दिली होती. सक्षम अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार होते. त्यानुसार प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निकालाची प्रत पाठवली. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय जाहीर केला.

महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांची संख्या ६६ असल्याने स्थायी समितीसह विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करताना तौलनिक संख्याबळाच्या आधारे सदस्यांची संख्या निश्‍चित करण्यात आली होती. भाजपच्या नगरसेविका सरोज आहिरे यांनी राजीनामा देत विधानसभेची निवडणूक लढविली तर पंचवटी विभागातील शांता हिरे यांचे निधन झाल्याने भाजपचे संख्याबळ दोनने घटले. घटलेल्या संख्याबळाचा विचार करता स्थायी समितीवर सदस्यांची निवडणूक करताना शिवसेनेचे तौलनिक संख्याबळ वाढल्याने अतिरिक्त एका सदस्याची नियुक्ती करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली होती. त्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाकडून निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याने भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयात त्या विरोधात धाव घेतली.

न्यायालयाने निवडणुक प्रक्रिया पार पाडताना बंद पाकिटात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. सभापती पदाच्या
निवडणुकीसाठी भाजपचे गणेश गिते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. कोरोनामुळे मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सुनावणी लांबणीवर पडली होती. सभापतीपदाचे उमेदवार गिते यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक व धोरणात्मक निर्णयासाठी स्थायी समिती अस्तित्वात असणे गरजेचे असल्याचा दावा न्यायालयात केला. न्यायालयाने बंद पाकिटातील निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. परंतू न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप पर्यंत संकेतस्थळावर प्रसिध्द झाली नव्हती. कोरोनामुळे न्यायालयीन कामकाज विस्कळीत झाल्याने अखेरीस चार दिवसांनी संबंधित आदेशाची सत्यप्रत महापालिकेसह याचिकाकर्ते गिते यांना वकिलांमार्फत प्राप्त झाली. ही प्रत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे तसेच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली त्यानुसार गणेश गिते यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात येत असल्याचे मांढरे यांनी जाहीर केले.

स्थायी समिती सभापतीपदी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माझी नियुक्ती केल्यामुळे या प्रक्रियेत सर्वांनी मदत केल्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. शहराचा सर्वांगीण व पायाभूत विकास करण्याबरोबरच सद्यस्थितीमध्ये कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल. भाजपाच्या सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्याला अनुसरून विकास केला जाईल.

गणेश गिते, स्थायी समिती सभापती

First Published on: April 8, 2020 9:44 PM
Exit mobile version