‘मॅजिक कप’द्वारे भाजपचे ओबीसी जोडो

‘मॅजिक कप’द्वारे भाजपचे ओबीसी जोडो

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून संवाद संपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच केंद्र व राज्य सरकारने ओबीसींसाठी राबवलेल्या विविध योजना याद्वारे पोहचवण्यात आल्या. पुढील टप्प्यात संपूर्ण राज्यात ओबीसींचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय चाय पे चर्चा कार्यक्रमाद्वारे मॅजिक कप या अनोख्या उपक्रमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील, असे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले. नाशिक येथे संपर्क अभियनाप्रसंगी ते बोलत होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व घटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओबीसी जोडो अभियानाकडे पाहिले जात आहे. नाशिक येथे यानिमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चौधरी म्हणाले, ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्यात संवाद संपर्क अभियान राबविण्यात आले. ओबीसीमधील ३४८ जाती आणि विविध संघटनांसोबत संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संवाद संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ओबीसी अंतर्गत विविध घटकांची माहिती घेण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून ओबीसींमधील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनामार्फत करण्यात येत असल्याचेही विजय चौधरी यांनी स्पष्ट केले. पुढील टप्प्यात आता लोकसभानिहाय ओबीसींचे मेळावे आयोजित केले जाणार आहेत. शिवाय चाय पे चर्चा उपक्रमात मॅजिक कप हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सुरुवातीला रिकामा ग्लास असेल त्यावर कुठलेही चित्र किंवा वाक्य नसेल मात्र जस जसा यात चहा ओतला जाईल. त्यावर आपोआप मोदींचे छायाचित्र व सरकारच्या योजनांची माहीती दिसू लागले. याद्वारेे केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे प्रत्येक भाजप बुथवर ओबीसी मोर्चाचे दोन पुरूष आणि दोन महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. ओबीसी समाजाची जनगणना २०२२ पर्यंत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, क्रिमिलेअरची मर्यादा ६ वरून ८ लाखापर्यंत करणे, समाजातील दुर्बल घटकाच्या सर्वेक्षणासाठी डॉ. रोहीणी आयोगाची स्थापना करणे आदी महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंघाची चाचपणी

या संवाद अभियानाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिकमधील येवला, तसेच मराठवाडा, विदर्भात ओबीसींचे प्राबल्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची चाचपणी करून मेळावे घेणार असल्याचे ते म्हणाले.

First Published on: February 11, 2019 3:09 PM
Exit mobile version