नाशकात कारचालकाचा थरार; 19 पोलीस वाहनांसह सिनेस्टाईल पाठलाग

नाशकात कारचालकाचा थरार; 19 पोलीस वाहनांसह सिनेस्टाईल पाठलाग

लॉकडाऊन असताना रस्त्यावर आलेल्या कारचालकास  रविवारी (दि. 26) सायंकाळी गंगापूर पोलिसांनी हटकले असता त्याने बेरिकेट्स तोडून पळ काढला. संशय आल्याने पोलिसांनी सुमारे 19 वाहनांसह त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. कारचालकाने गंगापूर, सातपूर, सिडको लेखानगर, गोविंदनगर, मुंबईनाका, उड्डाणपूल, शिवाजी चौक येथे भरधाव कार चालवून पोलीसगाडीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी नाकाबंदी करत त्याला अंबड परिसरात ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता कारमध्ये दारूच्या बाटल्यांचे बॉक्स सापडले.

लॉकडाऊन असल्याने पोलिसांनी चौकाचौकात नाकाबंदी करून बेरिकेट्सने रस्ते बंद केले आहेत. विनाकारण भटकंती करणाऱ्यावर पोलीस कारवाई करत आहेत. रविवारी सायंकाळी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एक कारचालक कारसह आला. पोलिसांनी त्यास हटकले असता त्याने बेरिकेट्स तोडून पलायन केले. पोलिसांनी संशयामुळे त्याचा पाठलाग सुरू केला.  ही बाब गंगापूर पोलिसांनी नियंत्रण कक्षास सांगितली. नियंत्रण कक्षाचा संदेश मिळताच कारचालकास पकडण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस सतर्क झाले. सुमारे 19 पोलीस वाहनांनी कारचालकाचा पाठलाग केला. अखेरीस अंबड पोलिसांनी त्याला बडदेनगर येथे ताब्यात घेतले. त्याच्या कारची तपासणी केली असता कारमध्ये दारूच्या बाटल्यांचे दोन बॉक्स सापडले. पुढील कारवाईसाठी त्यास गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

First Published on: April 26, 2020 7:38 PM
Exit mobile version