टोइंगच्या रागातून कारचालकाची पोलिसाला मारहाण

टोइंगच्या रागातून कारचालकाची पोलिसाला मारहाण

प्रातिनिधीक फोटो

नवीन सीबीएसच्या प्रवेशद्वारावर पार्क केलेली कार टोईंग केल्याच्या रागातून कारचालकाने पोलिसालाच शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शनिवारी, २७ एप्रिलला रात्री १२ वाजता घडली. रात्री १२ वाजता टोइंगची झालेली कारवाई नागरिकांसाठी चर्चेचा भाग ठरली होती.

याप्रकरणी पोलीस शिपाई अरुण मुरलीधर भोये यांनी सरकारवाडा पोलिसांत तक्रार केली आहे. बालाजी हनुमान शिंदे (३२, रा.सावतानगर, भराडे गॅस एजन्सीजवळ, सिडको) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी व पोलीस हवालदार शेळके, पोलीस नाईक वाघमारे ठक्कर बाजार येथे गस्त घालत असताना नवीन सीबीएसच्या प्रवेशव्दारावर स्विफ्ट कार (एमएच १५, ईएफ ०६८८) पार्क केलेली पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी चौकशी करूनही कारचालक दिसले नाहीत. शेवटी पोलिसांनी कार टोईंग करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात बालाजी शिंदे घटनास्थळी आला. तुम्ही पोलीस फक्त पैसे खाण्यासाठीच आले आहात. तुम्हाला फक्त पैसेच पाहिजे, अशी आरडाओरडा त्याने सुरू केली. तुला इथेच फाडून टाकेन, अशी धमकीही शिंदेने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करताच पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन त्याने धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक पाथरे करत आहेत.

First Published on: April 28, 2019 6:49 PM
Exit mobile version