दिलासादायक : नाशिकमधील पहिला कोरोना रुग्ण पूर्णपणे बरा, यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज 

दिलासादायक : नाशिकमधील पहिला कोरोना रुग्ण पूर्णपणे बरा, यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावनजीक (लासलगाव) येथील पहिला कोरोनाबाधित पुर्णपणे बरा झाला आहे. दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यास मंगळवारी (दि.14) सकाळी 11 वाजता जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाने यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांनी टाळ्या वाजवून रुग्णास निरोप दिला.

निफाड तालुक्यातील लासलगावजवळील पिंपळगावनजीक  येथील रुग्णास १२ मार्चपासून खोकला व ताप अशी लक्षणे आढळून आली होती. त्यास न्युमोनिआ सदृष लक्षणे वाटत असल्याने तो शुक्रवारी (दि.२७ मार्च) जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेतल्यानंतर वैद्यकीय चाचणी केली असता रविवारी (दि.२९) त्यास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या रुग्णावर उपचार सुरु केले. औषधोपचारांच्या जोरावर हा रुग्ण ११ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बरा झाला. त्याला डॉक्टर व कोरोना विलगीकरण कक्षातील परिचारिकांनी मानसिक आधार दिला. खबरदारी म्हणून या रुग्णाची दोनवेळा वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्याचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यास घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास मंगळवारी सकाळी घरी सोडण्यासाठी टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला. यावेळी 15 दिवसापासून जिल्हा रुग्णालयात उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि जिल्हा प्रशासनाचे रुग्णाने आभार मानले.

लासलगावात स्वागत 

मंगळवारी दुपारी दिड वाजता लासलगाव येथील शाळेत कोरोनामुक्त रुग्ण आला. त्यास बीडीओ संदीप कराड, लासलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी साहेबराव गावले, सरपंच सुनीता शिंदे, ग्रामसेवक कदम, सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी शाल श्रीफळ देवून स्वागत केले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 21 जणांची शासनाच्या देखरेखीखाली सुरू असलेली क्वारंटाईनची मुदत संपल्याने त्यांना ही डिस्चार्ज देण्यात आल्याने लासलगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्त रुग्णास पुढील 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

First Published on: April 14, 2020 6:59 PM
Exit mobile version