जिल्हा परिषद मारहाणप्रकरणी चौघांविरोधात आरोपपत्र दाखल

जिल्हा परिषद मारहाणप्रकरणी चौघांविरोधात आरोपपत्र दाखल

टोकडे (ता. मालेगाव) ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणी 7 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी उपस्थित विठोबा द्यानद्यान यांना मारहाण करणार्‍या चौघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी येत्या 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. अपंग कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

टोकडे ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांच्या कागदोपत्री भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड यांच्याकडे सुनावणी होणार होती. या सुनावणीपूर्वीच तक्रारदारास मारहाण झाली. यातील संशयीत आरोपी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, सरपंच पुत्र भावलाल निमडे, ग्रामपंचायत रोजगार सेवक हटेसिंग धाडिवाल, नामदेव शेजवळ यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

टोकडे ग्रामपंचायतीने केलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार येथील रहिवासी विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. त्याआधारे चौकशी समिती नेमून झालेल्या प्रकाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेत सुनावणी होणार होती. त्यानुसार गावच्या सरपंच सुपडाबाई निमडे यांच्यावतिने अ‍ॅड.सचिन वाघ, ग्रामपंचायतीचे रोजगारसेवक हटेसिंग धाडीवाल, नामदेव शेजवळ आणि शांताराम लाठर हे जिल्हा परिषदेत उपस्थित होते. सुनावणी सुरु होण्याच्या काहीवेळ अगोदरच तक्रारदार विठोबा द्यानद्यान हे येथे पोहोचले. त्यांना बघताच दोघांनी मारहाण केली व कॉलर पकडून त्यांना सीईआेंच्या दालनात ओढत नेले. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ प्रकरणातील हा संशयीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. अखेर पोलिसांना बोलवताच संशयीत आरोपी येथून फरार झालेे. त्यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी नाशिकच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

First Published on: June 30, 2021 6:42 PM
Exit mobile version