गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; पाणीपातळीत वाढ

गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; पाणीपातळीत वाढ

नाशिक : संततधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी (दि.१६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास गंगापूर धरणातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सायंकाळी हा विसर्ग १५०० क्युसेक वाढविण्यात आला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने गोदा पातळीत पुन्हा वाढ झाली असून, दुतोंडया मारूतीच्या गुडघ्याला पाणी लागले होते.

काही दिवसांपासून नाशिक शहर व गंगापूर पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदी-नाल्यांना पूर आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्र व घाट परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. नाशिकमध्ये सलग तिसर्‍या दिवशी दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम आहे. शहरात मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. गंगापूर धरणांतून बुधवारी सकाळी ६ वाजता ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. दरम्यान, सायंकाळी गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने रोकडोबा पटांगणावर उभी काही चारचाकी वाहने या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे लक्षात येताच काही युवकांनी ही वाहने पाण्याबाहेर ओढून सुरक्षित ठिकाणी उभी केली.

First Published on: August 17, 2022 2:38 PM
Exit mobile version