नाशिकमध्ये थंडीचा कहर; द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता

नाशिकमध्ये थंडीचा कहर; द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता

नाशिक द्राक्ष बाग

वाईन सिटी अशी जगभरात ख्याती असलेल्या नाशिक जिल्ह्याला थंडीचा चांगलाच तडाखा बसला आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना सोसावा लागत आहे. गुरुवारी निफाड तालुक्यातील उगावमध्ये ० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतावले आहेत. निफाड तालुक्यात पारा २ अंशाच्या खाली आल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना गारवा चांगलाच जानवत आहे. वाढत्या थंडीचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील द्राक्षबागांवर होऊ लागला आहे.

द्राक्षबाग वाचवण्याचे प्रयत्न सुरु

वाढत्या थंडीत द्राक्षमण्यांना तडे जाणे, वाढ खुंटणे, द्राक्ष कुजणे, झाडांची मुळे चॉक-अप होणे, द्राक्षघडात साखर उतरण्याची प्रक्रिया पूर्णतः थांबणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. थंडीपासून बागा वाचविण्यासाठी शेतकरी मध्यरात्री बागेत शेकोटी पेटवून उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पहाटे उठून द्राक्षबागांना ठिबक पद्धतीने पाणी देत बागांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत आहेत.

शेतकरी पुन्हा चिंतेत

जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र स्वरूपाची असून, निफाड तालुक्यात सर्वात कमी तापमान आहे. येथील लहान मोठ्या गावांमध्ये नागरिकांना थंडीचा चांगलाच दणका बसला आहे. द्राक्षबागांचे सर्वाधिक क्षेत्र नाशिक, निफाड, चांदवड तालुक्यात असून वाढत्या थंडीमुळे या ठिकाणचे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत. तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली येत असल्याने थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळे भुरी रोगाची लागण या बागांना लागत असून या द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहे. त्यामुळे आपल्या बागा वाचविण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली असून वाढत्या थंडीने त्यांची झोप उडवली आहे.

बागांना शेकोटी करुन उब दिली जाते

वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादन प्रक्रिया थंडावली असून येत्या काळात देशात आणि परदेशात द्राक्ष निर्यात करताना कमी उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांपासून आयात निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून आपली द्राक्षबाग या बोचऱ्या थंडीपासून कशी वाचवता येईल यासाठी ते शर्थीने प्रयत्न करत आहेत. वाढत्या थंडीचा फटका द्राक्ष उत्पादन करताना होत असून, द्राक्षांना तडे पडणे, भुरी रोगाची लागण होणे आदी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. रात्रभर जागून या बागांना शेकोटी देत उब देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे खड़कमाळेगाव येथील द्राक्ष उत्पादक संजय गवळी यांनी म्हटले आहे.

First Published on: December 31, 2018 10:21 AM
Exit mobile version