नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट

राज्यात थंडी परतली

उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे वायव्य भारतात तीव्र थंडीची लाट आली आहे. हे शीत वार्‍यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येत असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. मंगळवारी २९ जानेवारीला सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात ३.६ अंश सेल्सिअस, तर निफाड येथे ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील विदर्भ भागातील बुलडाणा, अमरावती, यवतमाळ येथे थंडीचा कडाका वाढला आहे.

उत्तरेकडून येणारे थंड वारे, पूर्वेकडील उष्ण व बाष्पयुक्त वार्‍यांच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे राज्यात मागील आठवड्यात पाऊस आणि गारपीट झाली. थंड वारे आणि ढगाळ हवामानामुळे वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांसह उत्तर महाराष्ट्रात रविवार २७ जानेवारी हा थंड दिवस ठरला. सोमवारी सकाळी पश्चिम राजस्थानच्या चुरू आणि पंजाबच्या अमृतसरमध्ये ०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या शीतलहरी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे आल्याने थंडीची लाट आली होती.

धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वांत कमी तापमान नोंदले गेले. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुलडाणा येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ७.१ अंशांची घट झाल्याने थंडीची तीव्र लाट आली. अमरावती येथे ४.९ आणि यवतमाळ येथे ५.८ अंश सेल्सिअसने किमान तापमानाचा पारा घसरला होता. राज्यात जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, मालेगाव येथेही किमान तापमान १० अंशांच्या खाली उतरले होते.

First Published on: January 30, 2019 10:33 AM
Exit mobile version