स्मार्ट रस्त्यावरुन कलगीतुरा; डॉ. हेमलता पाटील- प्रकाश थवील यांच्यात दावे- प्रतिदावे

स्मार्ट रस्त्यावरुन कलगीतुरा; डॉ. हेमलता पाटील- प्रकाश थवील यांच्यात दावे- प्रतिदावे

स्मार्ट रस्त्यावरुन कलगीतुरा; डॉ. हेमलता पाटील- प्रकाश थवील यांच्यात दावे- प्रतिदावे

अशोक स्तंभ ते गडकरी चौकादरम्यान सुरु असलेल्या स्मार्ट रोडवरुन आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन असा कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी या रस्त्याचा पंचनामा स्मार्ट रोडवर गाडी चालविताना रोलर कोस्टर राईडमध्ये बसल्याचा भास होतो, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जरूर ही एकविस कोटी रूपयांची राईड द्यावी, असा टोला लगावला. यासंदर्भातील उपरोधिक फलकही त्यांनी स्मार्ट रस्त्याच्या परिसरात मंगळवारी (ता. ३०) झळकावला. स्मार्ट रस्त्याच्या कामातील निविदेत दर्शविलेल्या नकाशांप्रमाणे वा कागदपत्रांप्रमाणेच केले जात नसल्याचा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यास स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी प्रत्त्युतर दिले असून स्मार्ट रोडसह त्यावर होत असलेली सर्व कामे काम नकाशा आणि मानांकनांनुसारच पूर्ण होत असल्याचा दावा केला आहे.

डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, स्मार्ट रोडच्या पूर्व बाजूने झालेल्या कामामध्ये नकाशात दाखविल्याप्रमाणे ड्रेनेजचे पाईप, पाणीपुरवठा लाईन्स, केबल्स टाकण्याकरीता बॉक्स केलेले आहेत , ते पश्चिम बाजूच्या रस्त्यावर केलेले दिसत नाहीत. सरळ जमिनीखाली सिमेंट पाईप टाकलेले दिसतात. जी गोष्ट स्मार्ट रस्त्याचे मुख्य अंग आहे तीच काढून टाकली तर यात कुठला स्मार्टनेस शिल्लक राहिला, असा सवालही त्यांनी केला.

डॉ. पाटील यांनी उपस्थित केलेले मुद्दे

थवील म्हणतात स्मार्ट रोड ‘योग्य मार्गावर’

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांपैकी एक आणि महत्त्वाचा असलेल्या स्मार्ट रोडचे काम अंतिम टप्यात आहे. स्मार्ट रोडसह त्यावर होत असलेली सर्व कामे काम नकाशा आणि मानांकनांनुसारच पूर्ण होत आहे. अंडरग्राऊंड केबल्सचे जे महत्त्वाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत होणार होते. ते एका बाजूला ट्रेंच आणि दुसर्‍याबाजुला सिमेंट पाईप वापरून करण्यात आले आहे. जागेची उपलब्धता आणि संबंधित उपभोक्ता विभागांच्या गरजेनुसार सदर काम करण्यात आले आहे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात आलेली नसल्याचे स्पष्टीकरण स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी दिले आहे.

सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रस्ता दुभाजकाचा रस्त्याच्या सुशोभिकरणात दुभाजक महत्त्वाचा दुवा असतो. नाशिक महानगरपालिकेने मे. जीजी एंटरप्रायजेस सोबत 2009 साली 15 वर्षांचा बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा असा करार केला असल्याने दुभाजकाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत होत नाही आहे. त्यामुळे मे. जीजी एंटरप्रायजेसच करार झाल्यापासून 15 वर्षे सदर दुभाजकाची दुरूस्ती देखभाल आणि सुशोभिकरण करणार आहे. कोणत्याही रस्त्यावर महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्या रस्त्यावरील पाणी रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये किंवा दुकानांमध्ये जाऊ नये विशेषत: पावसाळ्यात. त्यासाठी या रस्त्यावर पाणी साचू नये अशी संरचना करण्यात आली आहे. त्यानुसार सदर रस्त्यावर चेंबर आणि ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणे करून पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी लगतच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये जाणार नाही.

विशेष बाब अशी की गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसातही संबंधीत रस्त्यालगतच्या घरांमध्ये आणि दुकानांत पाणी गेले नाही. ही या प्रकल्पाची जमेची बाजू म्हणावी लागेल. याव्यतिरिक्त काही काही अडचणी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराकडून आवश्यक त्या उपाय योजना करून घेण्यात येतील. त्याचबरोबर प्रत्यक्ष काम करत असताना रस्त्याच्या अंतर्गत असलेली तांत्रिक कामे वाढली, जसे की जंक्शनचे क्षेत्रफळ वाढले, इलेक्ट्रीक पोलची संरचना स्मार्ट स्ट्रीट लाईट म्हणून शोभेल अशी करण्यात आली, पाण्याची तसेच मलनिस्सारणची पाईपलाईन वाढली, त्याचबरोबर काही बदल हे अत्यावश्यक आणि तांत्रिकदृष्ट्या करणे गरजेचे असल्याने ते त्या त्या वेळी करावे लागले आणि करावे लागत आहेत. तसेच केपीएमजी, पीएमसी, वाडिया या सल्लागारांना वेळोवेळी तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण प्रस्ताव सादर करणेबाबत आणि त्यानुसार कामे करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत आणि देण्यात येत आहेत.

सर्वात महत्त्वाचा म्हणजे सार्वजनिक शौचालयाचा विषय, स्मार्ट रोडच्या दोन्ही बाजुला 4 ठिकाणी ई-टॉयलेट करण्याची तरतूद आहे. आणि हे काम कंत्राटदारांमार्फत लवकरच हाती घेण्यात येत आहे. अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या मार्गादरम्यान डावीकडील सायकल ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. आणि उडवीकडील काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे बोलार्डचे अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या मार्गादरम्यान डावीकडील कामही पूर्ण झाले आहे आणि उजवीकडील काम लवकरच सुरू करण्यात येत आहे. स्मार्ट रस्त्यावर आराखड्याप्रमाणे 4 ठिकाणी क्रॉसिंगची तरतूद करण्यात आली आहे. तसेच  4 ठिकाणी बस थांबे असणार आहेत, त्यापैकी अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या मार्गादरम्यान डावीकडील दोन बस थांब्यांचे काम पूर्ण झाले असून उजवीकडील बस थांब्यांचे काम आणि फूटपाथचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. . अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या मार्गादरम्यान डाव्याबाजूकडील ग्रॅनाईट टॉप फूटपाथ सिटींग्जचे काम पूर्ण झाले आहे आणि उडवीकडील काम लवकरच हाती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर स्मार्ट रोडवर सीबीएसबाजूला रिक्षांसाठी दोन ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. स्मार्ट रोडची सर्व कामे आयआरसी आणि एमआरटीएचच्या नियमांनुसार आणि मानांकनांनुसारच होत आहे. त्यामुळे काही तृटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांच्या स्वखर्चाने आवश्यक दुरूस्त्या करून घेण्यात येतील, असेही थवीलांनी स्पष्ट केले.

स्मार्ट रोडची वैशिष्ट्ये-

स्मार्ट रोडवरील बस स्टॉपवर पब्लिक इनफॉर्मेशन सिस्टम बसवण्यात येत आहे. त्याद्वारे प्रवाशांना डिजीटल बोर्डवर माहिती मिळणार आहे. आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजंट ट्राफीक मॅनेजमेंट सिस्टम याद्वारे राबवण्यात येत आहे यामुळे प्रवाशांचा फायदाच होणार आहे. स्मार्ट रस्त्यावर एलईडी लाईट्स असणार आहेत. एनवायरमेंटल सेंसर रस्त्यावर असणार आहे, त्यामुळे पर्यावरणासंबंधीची म्हणजेच वातावरणातील बदलांची माहिती मिळण्यात मदत होणार आहे. इमर्जन्सी कॉल बॉक्स आणि पब्लिक डरेसिंग सिस्टमही स्मार्ट रोडवर असणार आहे. त्यामुळे इमर्जन्सीच्यावेळी प्रवाशांना तात्काळ मदत मिळण्यात आणि धोक्याची सूचना तात्काळ पोहोचण्यास मदत होणार आहे, असेही थवील यांनी म्हटले आहे.

First Published on: July 30, 2019 10:09 PM
Exit mobile version