निफाड बीडीओंना अजब सल्ला!

निफाड बीडीओंना अजब सल्ला!

निफाड तालुक्यातील तारुखेडले ग्रामपंचायतबाबत प्रशांत गवळी नामक व्यक्तीने ऑनलाईन केलेल्या तक्रारीची दखल गटविकास अधिकारी कार्यालयाने घेऊ नये, अशा आशयाचा ग्रामपंचायत ठराव करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे.

निफाड तालुक्यातील तारुखेडले ग्रामपंचायत नेहमीच वादामुळे चर्चेचा विषय बनलेली असते. ग्रामस्थ प्रशांत गवळी यांनी वारंवार ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार आणि अंतर्गत राजकारणामुळे विकास होत नसल्याची तक्रार आपले सरकार पोर्टलवर करून प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.

ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशांत गवळी यांच्या तक्रारींमुळे ग्रामपंचायत बदनाम होत आहे, त्यामुळे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देऊ नये, अशा आशयाचा ठराव गटविकास अधिकार्‍यांना देत अजब सल्लाच दिलेला आहे.

प्रशांत गवळी यांनी गावाच्या हितासाठी अनेक कामे मंजूर करून आणलेली आहेत

तारुखेडले येथील प्रशांत गवळी यांनी गावामध्ये गावाच्या हितासाठी अनेक प्रकारची कामे निवेदनाद्वारे मंजूर करून आणलेली आहेत. त्यांनी गावाच्या हितासाठीच काम केले आहे. प्रशांत गवळी यांनी मेहनतीद्वारे अनेक विकास कामे तारुखेडले गावात केली आहेत. – कृष्णा विजय देशमुख, तारुखेडले

ग्रामपंचायत मुस्कटदाबी करत आहे

तारुखेडले गावाच्या समस्या व विकासासाठी मी २०१३ साल पासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. मात्र, ग्रामपंचायत नोटीस पाठवून एक प्रकरे मुस्कटदाबी करत आहे. गावाच्या विकासासाठी म्हणणे मांडणे हा माझा भूलभूत अधिकार आहे.
– प्रशांत गवळी, तारुखेडले

समस्या संदर्भात गवळी सतत ऑनलाईन तक्रारी करतात

प्रशांत गवळी गावातील नागरिक असून ते साध्य नोकरीनिमित्त बाहेर गावी राहत असून गावातील समस्या संदर्भात ते सतत ऑनलाईन तक्रारी करत असतात; त्यांना कुठल्याही स्वरुपाची समस्या असल्यास त्यांनी समक्ष ग्रामपंचायत कार्यालयात येऊन चर्चा करून मार्ग काढावा. त्यांना ग्रामपंचायततर्फे सर्व सहकार्य केले जाईल.– ज्ञानेश्वर पवार, सरपंच, तारुखेडले

बाबी तपासून अहवाल कळवतो

असं काही झालेलं नाही. पंचायत समितीकडे असे कुठलही पत्र आलेले नाही. तरीही सर्व बाबी तपासून अहवाल कळवतो.
– संदीप कराड, गटविकास अधिकारी, निफाड.

First Published on: August 11, 2019 11:58 PM
Exit mobile version