विखेंच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे पाय आणखी खोलात

विखेंच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे पाय आणखी खोलात

शिर्डी मतदार संघातील आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे प्रचारासाठी शुक्रवारी, २६ एप्रिलला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा होत आहे. याच्या आदल्याच दिवशी गुरुवारी २५ एप्रिलला राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. राजीनामा स्वीकारला असल्याचे अशोक चव्हाण यांनी शिर्डी येथे लगोलग पत्रकार परिषद घेऊन जाहीरही केले. मुलाला भाजपाची उमेदवारी मिळाल्यानंतर राधाकृष्ण नेमके काय करतील, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्यानंतर शिर्डी मतदार संघात काँग्रेसचे पाय आणखी खोलात गेल्याचे मानले जात आहे. राहुल गांधींच्या सभेत या राजीनाम्याचे काय पडसाद उमटतात याकडे आता लक्ष लागले आहे.

राजीनामा देण्याआधी विखे यांनी शिर्डीतील काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध जाहीर दंड थोपटले. युतीकडून लोकसभेच्या रिंगणात असलेल्या सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी आपण आता काम करणार असल्याचे त्यांनीच बोलावलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले. पक्षप्रमुख मतदार संघात येत असताना त्याच मुुहुर्तावर त्यांनी राजीनामा देत आपला मार्ग स्पष्ट केला. शिर्डी मतदार संघ शेतीच्या बाबतीत संवेदनशील आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबाबत नाराजीचे वातावरण असल्याचे उघड बोलले जात आहे. मूळचे जामखेड भागातील असलेले लोखंडे खासदारकीच्या काळात शिर्डी मतदार संघात फारसे फिरकलेच नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मागील वेळी मोदी लाटेत निवडून आलेल्या लोखंडे यांना यंदाची वाट अवघड असल्याचे चित्र आहे. या स्थितीत विखेंच्या राजीनाम्याने फारसा फरक पडणार नाही. असाच सूर राजकीय तज्ज्ञांच्या वर्तुळातून उमटत आहेत. मूळचे स्थानिक नसलेले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदार संघाकडेच पाठ फिरवली आहे. दुष्काळाची परिस्थिती बिकट बनली असताना खासदारांनी लक्षच दिले नसल्याचे सांगितले जाते. या घडामोडींचा लाभ आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना होईल का, याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच मिळेल. याबाबत शुक्रवारी (दि.२६) संगमेनर येथे होणार्‍या सभेत राहूल गांधी काय भूमिका घेतील याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

First Published on: April 25, 2019 10:35 PM
Exit mobile version