तर सात दिवसांत शहरातील खड्ड्यांत वृक्षारोपण

तर सात दिवसांत शहरातील खड्ड्यांत वृक्षारोपण

महापालिकेच्या क्षेत्रात पडलेल्या खड्ड्यांच्या वादात शिवसेना, भाजप आणि मनसे पाठोपाठ काँग्रेसनेही उडी घेतली आहे. काँग्रेसचे नगरसेवक राहुल दिवे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सात दिवसांत खड्डे न बुजवल्यास स्थायी समितीचे सदस्य या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करतील, असा इशारा दिला. महापालिकेच्या अधिकार्‍यांना मलाईदार विभागांमध्ये रस असतो. त्यासाठी फार्म हाऊसमध्ये ते लॉबिंगही करतात. पण रस्त्यांसारख्या समस्या सोडवण्याकडे कोणाचा कल दिसत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

स्थायी समितीच्या गुरुवारी (दि. २४) झालेल्या सभेत दिवे म्हणाले की, प्रभाग क्रमांक २२ मधील पिंपळगाव फाटा ते पिंपळगाव, वडनेर रोड, विहीतगाव, प्रभाग क्रमांक १६ मधील उपनगर येथील मस्जिद, आगरटाकळी परिसर, प्रभाग क्रमांक १५ मधील काठे गल्ली परिसर, पखालरोड, अशोका मार्ग, प्रभाग क्रमांक १७ मधील दसकगाव तसेच शहरातील अनेक भागात खड्डे आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करुन रस्ते बांधले जातात. परंतु दर पावसाळ्यामध्ये शहरातील रस्त्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडतातच कसे? शहरातील रस्त्याच्या कामांची गुणनियंत्रण विभागामार्फत पडताळणी अथवा टेस्टिंग होत नाही काय, जर होत असेल तर एकच रस्ता दर पावसाळ्यात का दुरुस्त करावा लागतो, हे न उलगडणारे कोडेच आहे. रस्त्यावरचे डांबर दरवर्षी नक्की कोठे जाते, ज्या रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे, त्या रस्त्यांचे तीन वर्ष लायबलिटी पिरेड संबंधित मक्तेदाराकडे असते. मग आपण सदर मक्तेदाराकडून रस्त्यांची डागडुजी करुन घेत नाही का, करुन घेत असल्यास या वर्षी कोणकोणत्या मक्तेदारांना आपण पत्र दिले आहे की सदर रस्ते गेल्या वर्षी किंवा गेल्या दोन वर्षापूर्वी बनविले आहेत, तर त्या रस्त्यांवर खड्डे पडलेच कसे? हे खड्डे सात दिवसात बुजवावेत अन्यथा स्थायी समिती सदस्यांकडून प्रत्येक खड्ड्यात वृक्षारोपण केले जाईल असा इशाराही राहुल दिवे यांनी दिला आहे.

वनमाळींना पुन्हा कार्यभार कसा?

चोरी गेलेल्या फ्लड लाईट प्रकरणी महापालिकेच्या विद्युत विभागाचे कायकार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी यांच्याकडून महासभेने कार्यभार काढून घेतलेला असतानाही त्यांना परत त्याच पदाचा कार्यभार कसा देण्यात आला, महापालिकेच्या निर्णयाचा हा अवमान नाही का असे प्रश्न विचारत काँग्रेसचे नगरसेवक राहुल दिवे यांनी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा चौकशी अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश यावेळी सभापती गणेश गिते यांनी दिले. यावेळी दिवे म्हणाले की, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे महापालिकेच्या मोठ्या फ्लड लाईट होत्या. त्या चोरीला गेलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी हा मुद्दा काही महिन्यांपूर्वी महासभेत उपस्थित केला होता व त्याबाबत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले होते. या विषयात महासभेत इतर सदस्यांनी देखील हीबाब गंभीर स्वरुपाची असल्याबाबत मत मांडले होते. या महासभेत विद्युत विभागात कार्यरत असलेले वनमाळी यांच्याकडून पदभार काढून घेतला होता. या विषयावर चौकशी करण्याचे आदेशही महापौरांनी महासभेत दिले होते. या चौकशीतून काय निष्पन्न झाले याचे अजून काहीही माहित नसताना त्यांना त्याच पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. याचा खुलासा प्रशासनाकडून होणे गरजेचे असल्याचेही दिवे यांनी सांगितले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली असून त्यासंदर्भातील अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख शिवाजी चव्हाणके यांनी स्पष्ट केले. हा अहवाल स्थायी समितीच्या पुढील सभेत सादर करण्याचे आदेश यावेळी सभापतींनी दिले.

पोलवर केबल टाकण्याचे शुल्क घ्या

महापालिकेमार्फत रस्त्यांच्या दुतर्फा तसेच दुभाजकांमध्ये पथदीपांची उभारणी करण्यात आलेली आहे. या सर्वच पोलवरुन विविध केबल नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांच्या केबल्स टाकलेल्या आहेत. या केबल्स अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याने महापालिकेच्या पोलचे तसेच विद्युत पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या केबल्समुळे पोल खराब होतात आणि नुकसान मात्र महापालिकेचे होते. या बाबींचा विचार करुन प्रथमत: महापालिकेच्या पोल्सवर टाकण्यात आलेल्या केबल्स प्रथमत: काढून टाकण्याची मागणी राहुल दिवे यांनी स्थायी समितीला पत्र देऊन केली. संबंधित केबलधारकांकडून प्रतिदिन अथवा मासिक शुल्क आकारुन केबल टाकण्यास परवानगी द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

First Published on: September 24, 2020 11:59 PM
Exit mobile version