नाशिकमधील २२ नैसर्गिक नाल्यांवर इमारती; नगररचना अधिकार्‍यांना गुलाबपुष्प

नाशिकमधील २२ नैसर्गिक नाल्यांवर इमारती; नगररचना अधिकार्‍यांना गुलाबपुष्प

नैसर्गिक नाल्यांवर उभ्या राहिलेल्या इमारतींवर प्रश्नचिन्ह उभे करतानाच याकडे डोळेझाक करणाऱ्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देत डॉ. हेमलता पाटील यांनी या प्रकाराचा निषेध केला.

शहरातील २२ नैसर्गिक नाल्यांपैकी सर्वच्या सर्व बुजवून त्यावर इमारती उभ्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी पुढे आणली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात संपूर्ण शहरात पाणी साचल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय पूररेषेतील बांधकामांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. नगररचना विभागाने सर्व नियमांची पायमल्ली करीत पूररेषेत कोणत्या आधारावर परवानगी दिली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्राव्दारे आयुक्तांकडे केली आहे. असे नियमबाह्य कामे करणार्‍या नगररचना अधिकार्‍यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने त्यांचा निषेधही डॉ. पाटील यांनी शुक्रवारी (ता.९) केला.

आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिकमध्ये दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडला तरी संपूर्ण शहर पाण्याखाली जाते. शहरात २२ नैसर्गिक नाले उपलब्ध आहे असे उत्तर नगररचना विभागाकडून मिळाले होते. त्या नाल्यांचा शोध घेतल्यानंतर सर्व नाले बुजवून टाकून त्यावर टोलेजंग इमारती उभे असल्याचे कटू वास्तव समोर आले. शहरामधून वाहणार्‍या नंदिनी नदीला गटारगंगाचे स्वरूप प्राप्त झाले आह. याबाबतीत आंदोलन केल्यानंतर त्यामधील होर्डिंग व मिसळणार्‍या गटारीचे पाणी थोड्याफार प्रमाणात कमी झाले. परंतु नदीच्या काठाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. काही अज्ञात व्यक्तींनी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकल्याने यावर्षी मिलिंद नगर स्लॅम पूर्ण पाण्याखाली गेला. हा भराव कोणी व का टाकला याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. शहरांमध्ये चुकीच्या पद्धतीने परवानग्या घेऊन अनेक इमारती उभ्या आहेत. त्यांच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी जाण्यास वाट मिळत नाही. पर्यायाने सर्व इमारती पाण्याखाली जाऊन त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहेत मागण्या?

पूर रेषेमध्ये जी बांधकामे झाली आहेत त्यांची तातडीने चौकशी करून ही अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत. नंदिनी नदीवरील अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी गॅबियन वॉल व वृक्षारोपण करण्यात यावे व संपूर्ण शहरांमध्ये पावसाळी गटार योजना राबवावी. शहरांमध्ये असणार्‍या अनधिकृत बांधकामाबद्दल एखादी थर्ड पार्टी एजन्सी नेमून या सर्व बांधकामाची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवरती कारवाई करावी अशा मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी आयुक्तांकडे केल्या आहेत.

First Published on: August 9, 2019 10:20 PM
Exit mobile version