नाशकात संततधार सुरूच

नाशकात संततधार सुरूच

शहर व परिसरात पावसाची रिमझिम सुरू असून पहाटेही पावसाचा जोर कायम होता. तसेच त्यामुळे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १०.५ मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. मात्र त्र्यंबक, इगतपुरीत पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला असून आज सायंकाळपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी होते. गोदावरी पात्रात पुरसदृश परिस्थिती कायम आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये पावसाने जुलैची सरासरी ओलांडली. पावसाची संततधार सुरू असली तरी जनजीवन सुरळीत होते. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या तीन दिवसांपासून गंगापूर, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदेच्या पातळीत वाढ होऊन गोदावरीला पूर आला आहे. त्यामुळे पंचवटीतील रामकुंड परिसरातील लहान मंदिरांमध्ये पाणी शिरले. गोदाकाठच्या व्यावसायिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गंगापूर धरणातून बुधवारी सकाळपर्यंत करण्यात येत असलेला ९ हजार क्युसेकचा विसर्ग कमी करण्यात येउन तो ५ हजार ३१० क्युसेक करण्यात आला. सायंकाळनंतर विसर्ग आणखी कमी करण्यात येऊन ३ हजार १६८ क्युसेक करण्यात आला. होळकर पुलाखालून सकाळी ११ वाजेपर्यंत ११ हजार २१० क्युसेकने विसर्ग सुरू होता. तो दुपारनंतर ७ हजार ५६ झाला. दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आजूूबाजूच्या परिसरातून वाहून येणारे पाणी गोदापात्रात मिसळत असल्याने गोदेला पुरसदृशस्थिती कायम आहे. नांदुरमध्यमेश्वरमधून मंगळवारपर्यंत ५८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, बुधवारी हा विसर्ग कमी होऊन सायंकाळी ७ नंतर ४८ हजार ३९७ क्युसेक विसर्ग सुरू होता. बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत नाशिक शहरात ३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली, तर त्र्यंबकला ९७ मिमी, इगतपुरी १३४ मिमी, अंबोली ११७ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा जुलैच्या अखेरीस जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६८.८८ टक्के पाऊस झाला. या पावसाने धरणे भरू लागली असून जिल्हावासियांची टंचाईपासून सुटका होणार आहे.

आठवडे बाजारात पाणी

शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरामुळे दर बुधवारी भरणारा गंगाघाटावरचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला. गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती.पुराच्या पाण्याने गंगाघाटावरील जुन्या भाजीबाजारातही शिरकाव केला. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी गणेशवाडी, आयुर्वेद महाविद्यालय, गणेशवाडी देवीमंदिरापर्यंत रस्त्यावर भाजीबाजार मांडला होता.

धार्मिक विधीसाठी अडचण

रामकुंडावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे विविध धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या स्थानिक तसेच परगावच्या भाविकांना नदीकाठावरच धार्मिक विधी उरकते घ्यावे लागले.

धरणांतून विसर्ग (क्युसेक)

दिवसभरातील पाऊस

तालुका पाऊस मि.मी.
त्रयंबक ३७
सुरगाणा ४४
नांदगाव ४५
पेठ ३०
बागलाण ३
येवला ८
इगतपुरी ३९
दिंडोरी ७
चांदवड ४

First Published on: July 31, 2019 8:37 PM
Exit mobile version