करोनाच्या बचावासाठी बाप्पालाही लावला मास्क

करोनाच्या बचावासाठी बाप्पालाही लावला मास्क

थंडीचे दिवस आले की, पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला स्वेटर – मफलर घालतात. हे आतापर्यंत आपण पाहिले होते. मात्र, आता चक्क कोरानाच्या बचावासाठी नाशिकरांनी बाप्पाला मास्क लावले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरांनी अनोखी युक्ती वापरली आहे. चक्क ‘चांदीच्या गणपती’ला मास्क लावण्यात आला आहे.

चांदीच्या गणपती बाप्पाला लावला मास्क 

नाशिकमधील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या ‘चांदीच्या गणपती’ला कापडी मास्क लावण्यात आला आहे. सध्या या बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. जनजागृती करण्यासाठी बाप्पाला प्रतिकारात्मक मास्क लावल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आतापर्यंत एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. मात्र, असे असताना देखील या बाप्पाला लावण्यात आलेला मास्क चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या मास्कधारी बाप्पाला पाहण्यासाठी गणेशभक्तांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे.

मंदिरातील गर्दी ओसरली

जगभरात थैमान घालणारा करोना आता महाराष्ट्रात देखील हातपाय पसरु लागला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान देखील बंद करण्यात आली आहेत. शिर्डीचे साईबाबा मंदिर, कोल्हापुरचे अंबाबाई मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरलेली दिसून येत आहे.


हेही वाचा – राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३३ वरुन ३७ वर


 

First Published on: March 16, 2020 2:53 PM
Exit mobile version