दोन खून अन् सोन्याचा मुखवटा चोरणार्‍या अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

दोन खून अन् सोन्याचा मुखवटा चोरणार्‍या अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

रायगड जिल्ह्यातील दिवेआगार गणपती मंदिर दरोडाप्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून येवला तालुक्यातील भारम गावातून अटक केली. मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता आणि भारममध्ये तो शिवा जनार्दन काळे या नावाने राहत होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींवरुन गावकर्‍यांसह पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली असता अट्टल गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. सतीश ऊर्फ सत्या जैनू काळे (२६, रा.बिलवणी, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून कटावणी, टॉमी, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, तीन टॉर्चलाईट, एक चॉपर, एक चाकू जप्त केला आहे.

येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खरवंडी व रहाडी गावांमध्ये १९ ऑक्टोबर रोजी अनेक घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे व उज्जवलसिंह राजपूत यांनी पथके तयार करुन तपास सुरु केला. दरम्यान, येवला-वैजापूर सीमेवरील बिलवणी (ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) येथे संशयितरित्या एकजण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन दिवस सापळा रचून गुरुवार, दि.२२ ऑक्टोबर रोजी भारम परिसरामध्ये त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतेवेळी त्याने पोलिसांशी झटापट केली. त्याने तीन पोलिसांना चावा घेतला असता पोलिसांनी शिताफीने पकडले. पोलीस चौकशीत त्याने शिवा जनार्दन काळे सांगितले. पोलिसांनी त्याला न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

दोन वर्षापूर्वी भुसावळ स्टेशनवरुन फरार

२०१२ मध्ये दिवेआगार, गणेश मंदिर (जि.रायगड) येथील मंदिरामध्ये दरोडा टाकून दोन सुरक्षारक्षकांचा खून करून गणेशमूर्तीचा सोन्याचा मुखवटा चोरल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत १२ आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने त्या १२ जणांना विशेष मोक्का न्यायलय तथा अतिरिक्त सत्र न्यायालय, अलीबाग, रायगड यांनी शिक्षा सुनावली होती. त्यापैकी सतीश ऊर्फ सत्या जैनू काळे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होता. २०१८ मध्ये सतीश काळे यास सुनावणीकामी निफाड सत्र न्यायालयात आणले होते. सुनावणी झाल्यावर त्यास पोलीस रेल्वेने नागपूर येथे घेवून जात असताना तो भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन पोलिसांना तुरी देवून पळून गेला होता. तेंव्हापासून तो फरार होता.

गुन्हेगारावर मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात २८ गुन्हे

पोलिसांना सुरुवातीला त्याने शिवा काळे नाव सांगितले. पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली असता दिवेआगार गणपती मंदिर दरोडप्रकरणातील मुख्य आरोपी सतीश काळे असून २०१८ मध्ये तो फरार झाला आहे. तो अट्टल गुन्हेगार असून सध्या तो नाव बदलून राहत असल्याचे समोर आले. त्याच्यावर मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, शिक्रापूरसह विविध शहरांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, जबरे चोरी, दरोडा, खुनासहित दरोड्याचे २८ गुन्हे दाखल आहेत. अनेक जिल्ह्यातील पोलीस त्याचा शोध घेत होते.

पोलीस पथकास २५ हजारांचे बक्षीस

जीवाची पर्वा न करता अट्टल गुन्हेगारास सतीश काळे याला अटक करणार्‍या दोन पोलीस अधिकारी व चार कर्मचार्‍यांच्या पथकास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तो दोन वर्ष फरार असताना कोठे होता. नव्याने टोळी करत घरफोडी, दरोडयासह विविध गुन्हे केले आहेत का, याचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

First Published on: October 26, 2020 8:03 PM
Exit mobile version