जिल्हयातील ३७ हजार हेक्टर शेतीपिकांचे नुकसान

जिल्हयातील ३७ हजार हेक्टर शेतीपिकांचे नुकसान

जिल्हयात अतिवृष्टीमुळे ४४ हजार ८५९ शेतकरयांचे ३७ हजार ८३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, चांदवड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या पावसामुळे सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी पिकांचे नुकसान झाले. तर बागायती क्षेत्रात उस, कांदा, टमाटा व भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले.

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असताना जिल्ह्यात त्यामानाने पर्जन्याचे प्रमाण काहीसे कमी आहे. मात्र, चालू महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पावसाने सरासरी ओलांडली आहे. मालेगाव, बागलाण, कळवण, सिन्नर, येवला, नांदगाव, देवळा तालुक्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्य झाले आहे. या पावसामुळे पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. दहा तालुक्यांमधील २६३ गावांमधील ३७ हजार ८३० हेक्टरवरील उभी पिके पाण्यात गेली आहेत. त्यामध्ये भात, मका, कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कांदा, भाजीपाला, द्राक्ष, डाळींब, केळी आदी पिकांना फटका बसला आहे.

चांदवड तालुक्यात ३३ हजार २५ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. त्याखालोखाल येवल्यात २ हजार १८९ हेक्टरवरील पिके धोक्यात आली. सिन्नरमध्ये ९६९, निफाडमध्ये ४३२, देवळ्यात ३५४, सुरगाण्यात २५६.५०, मालेगावमध्ये २५२, नांदगावमध्ये १७५, कळवणमध्ये १७०.५० हेक्टरवरील पिके पावसामुळे बाधित झाली. दिंडोरीत ७.३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. दरम्यान, प्रशासनाने नुकसनीचा हा प्राथमिक अंदाज असून, त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे आहे नुकसान (हेक्टरमध्ये)

जिरायती क्षेत्र : २५ हजार ५४१.९५
बागायत क्षेत्र : ११ हजार ९६२.०४
वार्षिक फळपिके : ४.७०
बहुवार्षिक फळपिके : ३२१

First Published on: September 28, 2020 8:16 PM
Exit mobile version