नाशिक शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

नाशिक शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

नवीन नाशिक – शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या संततधार पावसाने बळीराजाच्या तोंडचं पाणी पळवलंय. विशेषतः द्राक्षपीकाला सर्वाधिक तडाखा बसला. बुधवारी (दि. १) सकाळपासून पावसाला सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं.

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे शहरातल्या उकाड्यात वाढ झाली होती. दोन दिवसांपासनं थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, बुधवारी सकाळपासून अचानक पावसाला सुरूवात झाली. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेले व्यापारी, व्यावसायिकांची निर्बंधांमधून सुटका झाली असतानाच आता ओमिक्रॉनची धास्त, ढगाळ हवामान आणि पावसाने या विघ्न आणले आहे. शेतकऱ्यांचीही काहीशी अशीच स्थिती झालीय. कोरोनाकाळानंतर शेतीमालाला भाव मिळू लागला असतानाच सातत्याने बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचीही चिंता वाढवलीय.

अवकाळी पावसाने फुटव्यात असलेल्या द्राक्षबागांसह फुलोऱ्यात व काढणीला आलेल्या द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. पावसाच्या धास्तीने काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागांवर प्लास्टिक अंथरले आहे. दुसरीकडे, हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये म्हणून द्राक्षबागांवर औषध फवारणी करावी लागतेय. त्यामुळे खर्च वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
ढगाळ वातावरण आणि पावसामुळे ४० ते ५० टक्के द्राक्षबागांवर डाऊनी व भुरी रोगाचा प्रादूर्भाव होऊन नुकसान होण्याची भीती वाढली आहे. याशिवाय कांदा, टोमॅटो, मका व भातपीकालाही या पावसाने तडाखा दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

First Published on: December 1, 2021 1:10 PM
Exit mobile version