जिल्हयात सायंकाळी सात वाजेनंतर कर्फ्यु

जिल्हयात  सायंकाळी सात वाजेनंतर कर्फ्यु

केंद्र सरकारने अनलॉक ३ च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनसंर्दभातील सूचना जारी केल्या आहेत. त्यानूसार नाशिक जिल्हयात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून केवळ मॉल सुरु करण्यास व आऊट डोअर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी अटीशर्तीसह परवानगी दिली जाणार आहे. इतर सर्व निर्बंध हे पूर्वीप्रमाणे नाशिक शहर व जिल्ह्यात हे नियम लागू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. त्यामुळे जिल्हयात सायंकाळी ७ वाजेनंतर संचारबंदी कायम राहणार आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या चार महीन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अंतर्गत’ लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केले असले तरी, अद्याप जनजीवन पूर्णपणे सुरळीत सुरू होउ शकलेले नाही. नाशिकचा विचार करता जिल्हयात सध्या १३ हजार कोरोना बाधित रूग्ण आहेत. यात नाशिक शहरात ८ हजार ४२२ रूग्ण आहेत. त्यामुळे ३१ जूलैनंतर नाशिकमध्ये कोणते निर्बंध शिथिल होणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागून होते. याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या जिल्ह्यात कोरोना स्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आहे परंतु अद्यापही धोका पूर्ण टळलेला नाही त्यामुळे काळजी घेणे आवश्यकच आहे. याकरीता सद्यस्थितीत ज्या पद्धतीने सर्व कामकाज सुरू आहे त्याच पद्धतीने सुरू राहील. फक्त त्यामध्ये मॉल व आउटडोर ऍक्टिव्हिटीची भर पडेल. या व्यतिरिक्त कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम राहणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

* कामकाजाची वेळ सकाळी 9 ते 7
* दुकानांसाठी सम विषम ही पध्दत कायम राहील.
* स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णय देखील कायम राहतील.
* सायंकाळी 7 नंतर शहरात संचारबंदी कायम.

एकीकडे कोरोना विषयक काळजी घेणे व दुसरीकडे अर्थचक्र सुरू ठेवणे याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न आपण वेळोवेळी करीत आहोत व त्यास योग्य यश देखील मिळत आहे. सद्यस्थितीत जेवढी रुग्ण संख्या वाढते आहे साधारणपणे त्याप्रमाणात रुग्ण बरेही होत आहेत त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. शासनाच्या निर्देशानूसार मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू होतील परंतु इतर कामकाज हे पूर्वीप्रमाणेच पुढे सुरू राहील.
सूरज मांढरे, जिल्हाधिरी

केंद्र सरकारने अनलॉक ३ ची नियमावली केली असून रात्रीची संचारबंदी हटवली असली तरी रात्रीच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. मास्क परिधान करून घराबाहेर पडावे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.
डॉ. आरती सिंह  पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

First Published on: July 30, 2020 6:16 PM
Exit mobile version