नाशिकमध्ये द्राक्ष व कांद्याला अवकाळी पावसाचा तडाखा, बळीराजा संकटात

नाशिकमध्ये द्राक्ष व कांद्याला अवकाळी पावसाचा तडाखा, बळीराजा संकटात

जायखेडा भागात द्राक्षबागांचे झालेले नुकसान

नाशिक : थंडीची चाहुल लागत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवार सकाळपासुन सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा हवादिल झाला असुन, विशेषतः तालुक्यातील कांदे, मका, कांदा रोप, द्राक्ष या महत्वाच्या पिकांबरोबरच इतर पिकेही संकटात सापडली आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांची एकच धावपळ उडालेली दिसून आली.

बागलाण तालुक्यातील तरसाळी, वनोली, औंदाणे, कौतिकपाडे, विरगाव, पिंगळवाडे, दसाणे, केरसाणे या परिसरातील कांदा, द्राक्ष, टोमॅटो, गहु, हरभरा, डाळिंब, भाजीपाला इ. पिकांच्या नुकसानीला शेतकर्‍यांना सामोरे जावे लागणार आहे. सोमवारपासुन तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतातील कांदा, कांदा रोप, द्राक्ष वाचवण्यासाठी शेतकरी पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असून, महागड्या औषधांची फवारणी बळीराजाने सुरू केली आहे.

आजच्या या पावसामुळे शेतमजुरांना माघारी फिरावे लागले. १५ दिवसांत दोनदा ढगाळ वातावरण तयार होऊन बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने कांदा पिकावर करपा आणि गहू पिकावर गेरवा रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असून, बागायती व रब्बी या दोन्ही पिकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. द्राक्ष उत्पादकांचे पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तोंडचे पाणी पळाले आहे. जनावरांच्या चार्‍याची मोठी नासाडी झाली आहे. शेतात काढून ठेवलेला रांगडी कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍याची एकच धावपळ उडाली.

द्राक्ष पिकाला मोठा तडाखा

या पावसाचा सर्वाधिक फटका काढणीवर असलेल्या व फुलोर्‍यात असलेल्या द्राक्ष बागांना बसणार आहे. दोन-तीन वर्षापासून अवकाळी पावसाने अर्ली द्राक्ष उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले होते. ती पार्श्वभूमी लक्षात घेऊन यंदा काहींनी उशिरा तर काहींनी अर्ली बागा घेतल्या. मात्र त्यांनाही तडाखा बसला.शेतातील पिकांसह पाळीव जनावरांसाठी साठवलेल्या चार्‍याचेही मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेमोसमी पाऊस बरसला. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणासारखा गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे नद्या-नाले वाहू लागले आहेत. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. वैरणी झाकण्यासाठी शेतकर्‍यांनी प्लास्टिक व ताडपत्रीचा आधार घेतली. दरम्यान, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन भरपावसात नुकसानीची पाहणी केली. शेतकर्‍यांना पीकविम्यासह पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल व कृषी विभागाला नुकसानभरपाईसाठी संबंधित अधिकार्‍यांना पत्र देण्यात आले असून, पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कांदा पिकावर करप्याचा प्रादूर्भाव

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाच्या परिणामामुळे कांदा पिकावर माव्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेंडे वाकडे होऊन कांद्यावर करपा पडला आहे. परिमामी कांदा उत्पादक चिंतेत सापडला आहे. कांद्याचे महागडे बियाणे घेऊन टाकलेल्या रोपांना पाऊस उघडल्यानंतर निर्माण होणारे धुके व दव घातक ठरणार आहे. रोग व किड प्रतिबंधकात्मक फवारणी करावी लागतेय.

First Published on: December 2, 2021 10:30 AM
Exit mobile version