रस्त्यातील झाडाला धडकून अभिजीत शिंदेचा मृत्यू

रस्त्यातील झाडाला धडकून अभिजीत शिंदेचा मृत्यू

होरायझन शाळेनजीक असलेल्या याच झाडावर स्विफ्ट आदळून अपघात झाला.

रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या एका झाडाने बुधवारी (२९ मे) गंगापूररोडवरील एका तरुणाचा जीव घेतला. सहदेवनगर येथील अभिजीत संजय शिंदे (वय ३०) हा तरुण पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घराकडे आपल्या स्विफ्टने जात असताना रस्त्यातील हे झाड त्याच्या लक्षातच आले नाही. त्यावर गाडी जोरदार आदळून तो जागीच ठार झाला. या अपघातानंतर नागरिकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यात येणारी झाडे तातडीने तोडण्याची मागणी केली आहे.

शहरात यापूर्वीदेखील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या झाडांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. यासंदर्भात नाशिककरांनी वारंवार आंदोलनात्मक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने झाडे तोडण्याची तयारी दर्शविली. मात्र, काही पर्यावरणप्रेमींनी त्यास विरोध करत उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने सर्वेक्षणानुसार रस्त्यात येणारी झाडे तोडण्याचे आदेश दिले. मात्र त्यातून आंबा, वड, पिंपळ यांसारखी झाडे तोडण्यास मज्जाव केला. त्यामुळे गंगापूर रस्त्यावर विशेषत: चिंतामणी मंगल कार्यालयापासून होरायझन शाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक झाडे अजूनही रस्त्यात आहेत. पर्यावरण प्रेमींच्या आग्रहामुळे महापालिका प्रशासनाला ते हटवताही येत नाहीत. त्यातूनच अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्यापासून हाकेच्या अंतरावर एक वळणही आहे. त्यामुळे वळणानंतर अचानक हे झाड समोर येऊन या ठिकाणी यापूर्वीही लहान-मोठे अपघात झाले आहेत.

First Published on: May 29, 2019 12:26 PM
Exit mobile version