प्राथमिक शाळांचा मुहूर्त लांबणीवर, आता १० डिसेंबरला होणार निर्णय

प्राथमिक शाळांचा मुहूर्त लांबणीवर, आता १० डिसेंबरला होणार निर्णय

नाशिक – महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका लक्षात घेता लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता १० डिसेंबरला फेरआढावा घेतल्यानंतर शाळांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

शासनाच्या आदेशांनुसार जिल्हा प्रशासनाने शहरातील १ली ते ७वी चे वर्ग सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि शिक्षण उपसंचालकांची बैठक झाली. त्यात १ ली ते ७ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय लांबवणीवर टाकण्यावर एकमत झाले. आठवीचे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी आणि शहरात ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरु झाले होते. त्यानंतरच्या पुढील टप्प्यात १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. त्यानुसार नाशिक शहरासह ग्रामीण भागातील साडेचार हजार शाळा सुरू होणार होत्या. मात्र, आता या निर्णयामुळे शाळांना आणखी काही दिवस थांबावे लागणार आहे.

नाशिक शहरात खासगी अनुदानित, विनाअनुदानित, महापालिकेच्या एकूण ७१२ प्राथमिक शाळा आहेत. तसेच, ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ३ हजार २६३ व खासगी शिक्षण संस्थांच्या ६६३ प्राथमिक शाळा आहेत. शहरात साधारणत: २ लाख विद्यार्थी तर, ग्रामीण भागात ५ लाख विद्यार्थी पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतात.

First Published on: November 29, 2021 6:41 PM
Exit mobile version