वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्यवळण रस्त्याची मागणी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्यवळण रस्त्याची मागणी

नाशिक :  शहराचा विकास झपाटयाने होत असून शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या बाहेरून बाह्यबळण रस्ता करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत याबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एमएसआडीसीला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपुर अधिवेशनात नाशिक शहरातील वाहतूकीसंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली. नाशिक शहरातून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग , मुंबई पुणे राष्ट्रीय मार्ग यासारखे विविध राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग जात असून जवळपास 70 किलोमीटरपेक्षा जास्त लांबी ही महामार्गांची आहे.

महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहने नागरी भागातून वळविली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली. शहराचा विकास झाल्यानंतर भूसंपादन करणे ही प्रक्रिया अवघड होत असल्यामुळे बाह्य वळण मार्ग करण्यास नागरिक विरोध करत असतात व सदर बाब खर्चिक देखील होत असते. त्यामुळे नाशिक शहरासाठी बाह्य वळण मार्ग करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. तर लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेण्याचे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य शासनाला दिले.

First Published on: December 21, 2022 4:54 PM
Exit mobile version