महालेंसाठी धडाडणार राज ठाकरेंची तोफ?

महालेंसाठी धडाडणार राज ठाकरेंची तोफ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

नाशिक लोकसभा निवडणूक न लढवताही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांनी विरोधकांना घायाळ करुन सोडले आहे. सभेमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ..’ हे वाक्य प्रेक्षकांच्या इतक्या सवयीचे झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पर्दापाश कसा होणार याची मतदारांनाही उत्कंठा लागून असते. नाशिकमध्ये येत्या २६ तारखेला राज गर्जना होणार असली तरी तत्पूर्वी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात त्यांची एक सभा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

आक्रमक शैलीतील भाषणांमुळे राज गर्जनेचा राज्यभर बोलबाला वाढला आहे. त्यांच्या सभांनी सत्ताधारी सेना, भाजपच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी येत्या २९ तारखेला मतदान होणार असल्यामुळे सर्वच पक्षातील स्टार प्रचाराकांच्या सभा आता येथे होणार आहेत. विरोधकांचे काम सोपे करुन देणारे राज ठाकरे यांच्या सभांना देखील मागणी वाढली आहे. दिंडोरी लोकसभेच्या रणांगणात त्यांची तोफ धडाडली तर वेगळे चित्र निर्माण होऊ शकते, याची पुरेपुर जाण आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता राज यांना मतदारसंघात आणण्याचे नियोजन सुरु केले आहे. शरद पवार यांची रविवारी (ता. २१) सायंकाळी ५ वाजता नांदगाव येथे सभा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी राज यांच्यासाठी पवारांना साकडे घालणार आहेत. शक्य झाले तर २३, २४ किंवा २५ एप्रिल रोजी लासलगाव किंवा निफाड येथे सभा घेण्याचे आवाहन केले जाणार आहे. नाशिकला २६ तारखेला सभा होणार असल्यामुळे नाशिकचा प्रश्न मार्गी लागतो. मात्र, दिंडोरीसाठी निफाड किंवा लासलगाव येथे सभा घेतल्यास येवला, नांदगाव, चांदवड व निफाड तालुक्यातील कार्यकर्त्यांना येथे सोयीचे होईल, यादृष्टीने हे नियोजन सुरु आहे. पदाधिकार्‍यांचा आग्रह असला तरी राज होणार भरणार का? यावर सर्व चित्र अवलंबून आहे.

लाव रे तो व्हिडीओ…

राज यांच्या सभेत ’लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य आता मोदी भक्तांना धडकी भरवत आहे. त्यामुळे नाशिकला दत्तक घेणार्‍या मुख्यमंत्र्यांची पोलखोल कशा पध्दतीने होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दिंडोरीसाठी त्यांनी सभा घेतली तर, मोदींच्या सभेला प्रत्युत्तर देणारी ही सभा ठरेल, असे म्हटले जात आहे.

First Published on: April 20, 2019 11:59 PM
Exit mobile version