५ लाखांची लाच घेताना उपसंचालकांसह तिघांना अटक

५ लाखांची लाच घेताना उपसंचालकांसह तिघांना अटक

प्रातिनिधिक फोटो

जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून ५ लाखांची लाच घेताना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिकचे उपसंचालक व विधि अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. पथकाने हॉटेल साईआसरासमोर, शिर्डी येथे गुरुवारी (ता.५) पंचासमक्ष दोघा अधिकार्‍यांच्या वतीने खासगी वाहनचालक व एका लॅबबॉयला लाच स्वीकारताना मुद्देमालासह अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिकचे उपसंचालक रामचंद्र रतीलाल सोनकवडे (४२, रा.व्दारका, नाशिक), विधिअधिकारी शिवाप्रसाद मुकुंद काकडे (४१, रा.सिडको, नाशिक), खासगी वाहनचालक विनायक ऊर्फ सचिन उत्तम महाजन (३३, रा.सिडको, नाशिक), गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे लॅबबॉय मच्छिंद्र मारुती गायकवाड (४८, रा.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार महिलेने हिंदू महादेव कोळी या जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन केलेल्या अर्जाची सुनावणी झाली होती. तरीही प्रमाणपत्र देण्यासाठी उपसंचालक रामचंद्र सोनकवडे व विधी अधिकारी शिवप्रसाद काकडे यांनी मच्छिंद्र गायकवाड यांच्या मार्फत ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेला बुधवारी (ता.४) ५ लाख रुपयांसह शिर्डीत भेटण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने पडताळणी पंचांसह मच्छिंद्र गायकवाड व सचिन महाजन यांच्यामार्फत उपसंचालक सोनकवडे व काकडे यांची शिर्डी येथील साई आसरा हॉटेलमधील रूम नंबर १०२ मध्ये भेट घेतली. त्यावेळी सोनकवडे व काकडे यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम होईल, असे सांगितले. गायकवाड व महाजनांनी प्रमाणपत्र देण्यासाठी सोनकवडे व काकडे यांना ५ लाखांची मागणी केली. त्यानंतर गायकवाडांनी मोबाईलवरून सोनकवडेंशी संपर्क साधत तक्रारदारांना रक्कम महाजनांकडे देण्यास सांगितली.

अहमदनगर लाचलुचपत विभागाने सापळा रचत महाजन यास गायकवाड व पंचासमक्ष ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री शिर्डी येथील हॉटेल साईआसरा समोरील रोडवर कारमध्ये उपसंचालक सोनकवडे, विधी अधिकारी काकडे यांच्यासाठी ५ लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली. त्यामध्ये ४ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा व ५० हजार नोटा जप्त होत्या. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने चौघांना अटक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

First Published on: September 5, 2019 7:11 PM
Exit mobile version