भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरेंनी घेतला उमेदवारी अर्ज

भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरेंनी घेतला उमेदवारी अर्ज

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खैरे यांच्यावतीने त्यांचे बंंधू अंबादास खैरे यांनी अर्ज घेतला. महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसल्याने राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे अंबादास खैरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. त्यामुळे आता महायुतीत नवा व्टिस्ट निर्माण झाला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होऊनही नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटू शकलेला नाही. नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे असली तरी राष्ट्रवादीच्या एंन्ट्रीमुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढली होती. मात्र महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली. भुजबळांच्या माघारीने शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जात असले तरी राष्ट्रवादीने नाशिकवरील आपला दावा कायम ठेवला आहे. गुरूवारीच भुजबळांनी माध्यमांशी बोलतांना आपण जरी माघार घेतली असली तरी परिवारातून कोणीही उमेदवार असू शकतो असे वक्तव्य केल्याने उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला आहे. अशातच शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून भुजबळ विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज नेल्याने खळबळ उडाली आहे. दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी हा अर्ज दिलीप खैरे यांच्यासाठी विकत घेतला.भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी आता भुजबळ यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार असे समोर येत आहे. एका बाजूला शिंदेंच्या शिवसेनेतून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते तर दुसर्‍या बाजूला भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज इच्छुक आहेत. दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने भुजबळांच्या या राजकीय खेळी बाबत नजरा विस्तारल्या आहेत. खैरे राष्ट्रवादी प्रदेश पदाधिकारी असून समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी मानले जातात तसेच भुजबळ नसतील तर ओबीसी चेहरा म्हणून त्यांना पुढे चाल दिली जाउ शकते अशीही चर्चा आहे.

First Published on: April 26, 2024 12:09 PM
Exit mobile version