दिंडोरी : लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद

दिंडोरी : लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : दिंडोरी शहरासह तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकर्‍यांना आपल्या शेतात जाणे जिकीरीचे झाले होते. ऐन शेतीकामांच्या वेळेला नागरिकांना बिबट दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लखमापूर येथे काल बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. असे असले तरी वनविभाग सातत्याने आपले कामकाज सुरूच ठेवत आहे. ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करणे व त्वरित पिंजरा लावणे हे काम सध्या वनविभाग दिंडोरी करत आहे व वनविभागाला यावेळी यश देखील आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, हनुमानवाडी शिवारात गेली कित्येक दिवस धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर धीरज काळे व निवृत्ती देशमुख यांच्या शेताच्या बांधावर ठेवण्यात आलेल्या पिंजर्‍यात अखेर जेरबंद झाला. अद्यापही या परिसरात आणखी दोन बिबट्यांचा संचार सुरू असून, त्यांनाही पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. बिबट्यामुळे सर्वांत जास्त नुकसान या शिवाराने गेल्या अनेक दिवसांपासून अनुभवले जात होते. लहान बालकांपासून तर वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा या बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेले आहेत. त्यात काही गंभीर जखमी झाले, तर काही बालकांना आपला जीव गमवावा लागला. हनुमान वाडीतील वस्तींवर राहणार्‍या लोकांना अगदी जीव मुठीत घेऊन शेतीचे कामे करावे लागत होते. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे वनविभागाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. अखेर वनविभागाला शनिवारी रात्री मोठे यश मिळाले. याठिकाणी कायमस्वरूपी पिंजरे लावले जात होते. तरी पण बिबट्या त्यात अडकत नव्हता, अनेकदा तर बिबट्या पिंजर्‍यावर बसलेला येथील नागरिकांनी अनेकदा बघितला होता.

हनुमानवाडी परिसरात तीन बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यापैकी एकच जेरबंद झाला आहे. दोन बिबट्यांसाठी परत पिंजरा लावण्यात आला आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती मिळताच काही वेळातच ते घटनास्थळी आले आणि विशेष वाहनाने बिबट्याला घेऊन गेले. रेंज फॉरेस्ट अधिकारी जोशी, सहायक वनसंरक्षक मोरे, वनपाल परिमंडळ अधिकारी रामचंद्र तुंगार, वनरक्षक अण्णा टेकनर, हेमराज महाले, परसराम भोये, रेश्मा पवार आदी कर्मचारी घटनास्थळी दखल झाले. आणखी पिंजरे या ठिकाणी मागविण्यात आल्याची माहिती वनविभागचे परिमंडळ अधिकारी रामचंद्र तुंगार यांनी दिली.

First Published on: October 12, 2022 12:40 PM
Exit mobile version