सरकार पडणार अशा चर्चा अस्तित्वासाठी सुरू ठेवाव्या लागतात : जयंत पाटील

सरकार पडणार अशा चर्चा अस्तित्वासाठी सुरू ठेवाव्या लागतात : जयंत पाटील

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीतील सहभागी पक्षांमध्ये कुरबुरी वाढू लागल्याने सरकार पडणार अशा चर्चा सुरू असतात या राजकिय स्थितीबाबत भाष्य करतांना जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले की, विरोधकांकडे १०५ आमदार आहेत त्यामुळे निदान आमदारांमध्ये धुगधुगी ठेवण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी अशा चर्चा सुरू ठेवाव्या लागतात असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. ’संजय राऊतांच्या मुलाखतीचे भाजप कौतुक कसं करणार? असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज जिल्हयातील भावली आणि वैतरणा धरणावर भेट देउन दिली. वैतरणेचं पाणी मुकणेमध्ये सोडण्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे नाशिक दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील एकूणच राजकिय स्थितीबाबत भाष्य केले. महाविकास आघाडीत काँग्रेसवर अन्याय होत असल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते याबाबत विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री काँग्रेसशी देखील चर्चा करत आहेत. काँग्रेसकडून नाराजी नाही. कालच आम्ही सगळे एकत्र होतो. अशोक चव्हाण नाराज नाहीत, हे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नाही, दरम्यान, नाशिकच्या पाणीप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, ’शेतकर्‍यांना भेटून चर्चा केली जाईल. भावली धरण परिसरात पर्यटनाची चांगली संधी आहे. जलसिंचन विभागाकडे काही जागांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सरकारकडे सध्या पैसे नाहीत, पण खाजगी उद्योजकांनी पुढे यावं,’ असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.

मंदिराला विरोध नाही पण कोरोनाचे संकट महत्वाचे

’कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदार संघात सर्वात आधी राम मंदिर बांधले. राम मंदिर निर्माण कार्याला आमचा विरोध नाही, पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे पण धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीच्या बाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील,’ असं आवाहन पाटील यांनी केले आहे.

First Published on: July 25, 2020 2:53 PM
Exit mobile version