शेतकरी-व्यापार्‍यांमध्ये मक्याच्या भावावरून वाद

शेतकरी-व्यापार्‍यांमध्ये मक्याच्या भावावरून वाद

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. २५) सकाळच्या सत्रात मक्याला सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असतांना दुपारी अचानक ढगाळ हवामान झाल्याचे कारण देत मका खरेदी करणार्‍या दोन बड्या व्यापार्‍यांनी लिलावात सहभाग न घेतल्याने उर्वरित मका व्यापार्‍यांनी संधी साधून १२०० रुपये प्रतिक्विंटल मक्याचा पुकारा केल्याने शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली.

सटाणा बाजार समितीने या प्रकरणी शेतकरी व व्यापारी यांच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने व्यापार्‍यांनी लिलावातून काढता पाय घेतल्याने मका विक्रीसाठी आलेली दोनशेहुन अधिक वाहने बाजारसमितीत लिलावाअभावी उभी आहेत.

सकाळ सत्रात जो मका १७०० रुपये प्रतिक्विंटल विकला गेला तोच मका चार तासांनी १२०० रुपये विकला जात असल्याचे पाहून शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मका व्यापार्‍यांच्या मनमानीविरोधात शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली असून, यावर आज मंगळवारी (दि. २६) मका व्यापार्‍यांची बैठक बोलावली असून तोडगा काढण्याचे आश्वासन शेतकर्‍यांना दिले आहे.

दरम्यान, बहुतांश शेतकर्‍यांकडे ताडपत्री नसल्याने बाजार समितीने मका पावसात ओला होऊ नये म्हणून शेडमध्ये वाहने लावण्याची व्यवस्था केल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला तरी ढगाळ वातावरणाची संधी साधून व्यापार्‍यांनी मक्याचे भाव तब्बल ५०० रुपयांनी पाडल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

First Published on: October 26, 2021 6:19 PM
Exit mobile version