पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २० कोटींची मदत प्राप्त

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २० कोटींची मदत प्राप्त

गोदाकाठच्या घरांना महापूराचा मोठा तडाखा बसला होता.

नाशिक जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात 20 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सध्या जिल्ह्यात पूरगग्रस्त भागाचे पंचनामे सुरू असून, शासन निर्देशानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

गेल्या १५ दिवसांपासून जोरदार पावसामुळे धरणे तुडुंब होऊन मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. यामुळे नद्यांना महापूर आले. दारणा- गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली. गोदावरीच्या महापुरामुळे नाशिक शहरात गोदाकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. शहराप्रमाणेच निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी तसेच आसपासच्या गावांनाही याचा जबर फटका बसला. सुमारे चार हजार कुटुंबे बेघर झाली. अनेक घरांची पडझड झाली. या पुरामुळे व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. पुरपरिस्थिती ओसरली असली तरी गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने पुरपरिस्थिती मात्र कायम आहे. अनेकांच्या घरात गाळ, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. नाशिकसह राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून नागरिकांना दिलासा मिळावा याकरता शासनाने मदतनिधीची घोषणा केली. तसेच पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात पंचनामे करण्यात येत असून नुकसान झालेल्या घराचे तसेच शेतीचे फोटो काढण्यात येऊन जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. नुकसान भरपाईसाठी शासनाने नाशिक जिल्ह्याकरता २० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

असे आहेत मदतीचे निकष

ज्या नागरिकांच्या घरात दोन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पाणी शिरून नुकसान झाले असेल ते कुटुंब मदतीस पात्र ठरणार आहेत. पक्क्या घरांचे १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर नुकसानीपोटी कुटुंबाला पूर्वी ५ हजार रुपये मदत दिली जात होती ती आता सहा हजार रुपये करण्यात आली आहे. कच्च्या घरांचे १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले असेल, तर त्यांना पूर्वी ३२०० रुपये मदत वाढवून ६ हजार रुपये करण्यात आली आहे.

First Published on: August 9, 2019 11:57 PM
Exit mobile version