जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांवर ; नगरने वाढवली नाशिकची चिंता

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांवर ; नगरने वाढवली नाशिकची चिंता

नाशिक जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत आली होती. मात्र,आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. विशेष करून निफाड, येवला, सिन्नर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून शेजारच्या नगर जिल्ह्यामुळे नाशिकमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने तातडीने उपययोजना राबविण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर बोलताना भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली असून याबाबत भुजबळांनी चिंता व्यक्त केली. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही २.८ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर गेला असून पॉझिटिव्हिटी दरात राज्यात नाशिक पाचव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात रुग्णसंख्या नियंत्रणात असली, तरी निफाड, येवला, सिन्नर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून कार्यक्रमांना होणारी गर्दी, तसेच बाजूच्या जिल्ह्यांमधून नागरिकांची ये-जा होत असल्याने ही रुग्णसंख्या वाढत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने ग्रामीण भागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. या बैठकीला आमदार नरेंद्र दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, सुहास कांदे, नितीन पवार, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

35 रुग्णवाहिका मंजूर

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेला 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजातून 35 रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील अंतर लक्षात घेता तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका बदलून नव्या रुग्णवाहिका मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. तसेच कंत्राटी तत्वावर काम करणार्‍या रुग्णवाहिका चालकांचे प्रलंबित वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

वीज खंडीत करू नका

आता कुठे चांगला पाऊस झाला आहे. शेतीची कामे सुरू आहेत, त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करण्याअगोदर नियमाप्रमाणे पूर्वसूचना द्याव्यात. जेणेकरून शेतकर्‍यांना वीजबिल अदा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल अशा सूचना भुजबळ यांनी दिली.

First Published on: September 25, 2021 5:49 PM
Exit mobile version