जिल्हा १५ डिसेंबरपर्यंत होणार खडडेमुक्त; पालकमंत्र्यांच पुन्हा नव्याने आश्वासन

जिल्हा १५ डिसेंबरपर्यंत होणार खडडेमुक्त; पालकमंत्र्यांच पुन्हा नव्याने आश्वासन

नाशिक : नाशिक जिल्हयातील बांधकाम विभागांतर्गत येणार्‍या सर्व राज्य महामार्गांवरील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खडडेमुक्त करण्यात येणार असून, डिसेंबर अखेर जिल्हयातील ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. शहरातील खडडयांबाबत महापालिका आयुक्तांशी येत्या दोन तीन दिवसांत चर्चा करून डिसेंबरपर्यंत शहरातील रस्तेही खडडेमुक्त करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीत कर्जमुक्ती आढावा, महावितरण, बांधकाम, जिल्हा रूग्णालयाचा आढावा घेण्यात आला. शहरासह जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून खडडयांचा प्रश्न चर्चेत असून यामुळे अपघातांच्या संख्येतही मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. खडडयांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले.

विविध राजकीय पक्ष, संघटनांनी याविरोधात आंदोलने केली मात्र रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. त्याचप्रमाणे मिर्ची हॉटेल चौकात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बस दुर्घटनेनंतर ब्लॅकस्पॉटचा मुददाही चर्चत आला. या सर्व विषयांवर शुक्रवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. याबाबत बोलतांना भुसे म्हणाले की, पुरामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. याची दखल घेत बांधकाम विभागाअंतर्गत येणार्‍या सर्व राज्य महामार्गांवरील खडडे १५ डिसेंबरपर्यंत बुजवले जातील. त्याचप्रमाणे जिल्हयातील १४ ब्लॅकस्पॉटवरही डिसेंबर अखेर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांची कामे करतांना ती गुणवत्तापूर्वक करावी, पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतर्गत ठेकेदारांना कामे देण्यात आली आहेत. कामे पुर्ण झाल्यानंतर तीन वर्ष या रस्त्याची देखभाल दुरूस्तीची जबाबदारीही त्या संबधित ठेकेदाराची असून याबाबत आढावा घेऊन जर या रस्त्यांची दुरावस्था झाली असेल तर ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

First Published on: November 24, 2022 7:18 PM
Exit mobile version