जिल्ह्यात ७ लाख कुटुंबियांना दिवाळी गिफ्ट

जिल्ह्यात ७ लाख कुटुंबियांना दिवाळी गिफ्ट

नाशिक : दिवाळी सण गोड व्हावा, यासाठी राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रूपयांत देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. यात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल यांचे प्रत्येकी एक किलोचे किट देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ७ लाख ९३ हजार ५९१ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सणासुदीत दिवाळीला पूर्वी रेशनवर गहू, तांदळासोबतच पाम तेल, साखर, चनाडाळ, रवा-मैदा मिळायचा. हळूहळू रवा व मैदा गेला व पाम तेल बंद झाले. गेल्या दिवाळीत काहींना चनाडाळ व साखर मिळाली. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून आर्थिक परिस्थिती खराब आहे. त्यामुळे रेशनवर किमान यंदाच्या दिवाळीत पाम तेल, साखर, चनाडाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गोरगरीब जनतेतून होत होती. त्याची दखल घेत राज्य शासनाने यंदा रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल यांचे प्रत्येकी एक किलोचे किट अवघ्या १०० रुपयात देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील ७ लाख ९३ हजार ५९१ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यात १ लाख ७४ हजार ९१८ अंत्योदय तर, ६ लाख १८ हजार ९१८ प्राधान्य कुटूंबातील रेशनकार्डधारक आहेत. या सर्व लाभार्थांना प्रती एक किलो साखर, तेल, चनाडाळ आणि रवा मिळणार आहे. त्याची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदवली असून लवकरच ते रेशनवरुन लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

First Published on: October 7, 2022 12:43 PM
Exit mobile version