डॉक्टरसाहेब, ’अ‍ॅडजस्टमेंट ड्युटी’ थांबवा, मुख्यालयी राहून सेवा द्या; शिंदे गट आक्रमक

डॉक्टरसाहेब, ’अ‍ॅडजस्टमेंट ड्युटी’ थांबवा, मुख्यालयी राहून सेवा द्या; शिंदे गट आक्रमक

नाशिकरोड : शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक वैद्यकीय अधिकार्‍यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही काही वैद्यकीय अधिकारी कामाच्या ठिकाणाकडे फिरकतही नाहीत. मात्र, वैद्यकीय सेवेबाबतचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांनी वैद्यकीय अधिकारी दोषी किंवा अ‍ॅडजेस्टमेंट ड्युटी करताना आढळ्यास संबंधिताची थेट आरोग्यमंत्र्यांकडे करण्याचा इशाराही दिला.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच राज्यातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांची आरोग्य सचिव पदावर रुजू झाल्याने आरोग्य विभागातील कामचुकारांचे धाबे दणाणले आहे. वैद्यकीय अधिकारी अनेकदा मुख्यालयी आढळून येत नसल्याच्या तक्रारी होत असल्याने कामचुकारपणाला चाप बसणार असल्याचे जिल्हाप्रमुख ढिकले यांनी सांगितले. आपलं महानगरशी बोलताना ढिकले म्हणाले की, जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे २२० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. अ‍ॅडजेस्टमेंट ड्युटी करण्याची पद्धत प्रचलित झाली आहे.

आठवड्यातून केवळ एक-दोन दिवस कामाच्या ठिकाणी थांबून महिनाभराचे वेतन घेण्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वीच तालुका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असते. सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेत इंजेक्शन व उपचार मिळणे आवश्यक असते, प्रसूतीसारख्या अत्यावश्यक सेवा व उपचारांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. तसेच, वशिल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक सोयीच्या ठिकाणी होत असल्याचेही दिसून आले आहे. यामुळे कर्तव्यदक्ष कर्मचारी व अधिकारी सुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे मागणी करणार असल्याचे ढिकले यांनी सांगितले.

First Published on: November 5, 2022 2:29 PM
Exit mobile version