मातोश्रीनगर परिसरात कुत्र्यांचा उच्छाद, महिलेसह चारजण जखमी

मातोश्रीनगर परिसरात कुत्र्यांचा उच्छाद, महिलेसह चारजण जखमी

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून नाशिकच्या मखमलाबाद, हिरवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. याच दरम्यान मातोश्रीनगर परिसरात एका भटक्या कुत्राने एका महिलेला चावा घेतल्याची बाब समोर आली आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ती महिला जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांत विशेषतः लहान मुले आणि महिलांमध्ये दहशत पसरली आहे. सध्या सुट्टीचे दिवस असल्याने अनेक लहान मुले या परिसरात खेळत असतात. अशात पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी देखील येथील लहान मुलांवर हल्ला केल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या घटनेने मखमलाबाद रोडवरील मातोश्री नगर परिसरात घबराट पसरली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

नाशिक शहर परिसरातील अनेक विभागात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. केंद्र सरकारने भटक्या कुत्र्यांना मारण्यास प्रतिबंध केल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. नाशिक शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड विभागात कुत्र्यांनी थैमान घातले असून रस्त्यावरून चालणार्‍या माणसांवर भुंकणे, चावणे अशा घटना वारंवार घडत आहेत. रात्री कामावरून घरी जाणार्‍या कर्मचार्‍यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असून महापालिकेने कार्यवाही करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पंचवटीतील विविध भागातील अनेक रहिवासी हे कामगार वसाहतीतून रात्रपाळीसाठी दुचाकीवरून प्रवास करीत असतात. त्यावेळी दुचाकीवर झेप घेणार्‍या भटक्या कुत्र्यांमुळे मोठे अपघातही परिसरात घडत आहेत. पंचवटीतल्या रामकुंड परिसरातही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. तेथे येणार्‍या पर्यटकांना अनेकदा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जागोजागी लावलेल्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, धाबे तसेच लोकांनी बेजबाबदारपणे फेकून दिलेले उरलेले अन्न, कोंबडी-मटणाची दुकाने, मासळी बाजार, कचर्‍याचे ढिगारे अशा गोष्टींमुळे सर्वच ठिकाणी भटकी कुत्री सहजतेने पोसली जातात. त्यामुळे दिवसेंदिवस अशा भटक्या कुत्र्यांच्या संख्येबरोबर कुत्र्यांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रकारही वाढत चालले आहेत.

गेल्या वर्षी मालेगाव स्टँड परिसरातील चिंचबन परिसरात पाळीव श्वानाने एका मुलाला चावा घेतल्याचा प्रकार उघड झाला होता. ज्या श्वानाने चावा घेतला होता त्या प्रजातीचे श्वान पाळण्यास बंदी असल्याची चर्चा त्यावेळी समोर आली होती. शहरातील पाळीव श्वानांची नोंद महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील अनेक श्वान प्रेमींनी त्यांच्या पाळीव श्वानांची नोंद केलेली नाही.

मातोश्रीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती जॉगिंग ट्रॅकवरून चालत असतांना कुत्रयांने त्या व्यक्तीच्या अंगावर झडप घालत चावा घेतल्याची घटना घडली. सदरच्या घटनेत इसम जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या परिसरात उद्यान आहे. या उद्यानात सायंकाळच्या सुमारास लहान मुले, नागरिक फिरण्यासाठी येत असतात मात्र परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

First Published on: April 9, 2024 6:24 PM
Exit mobile version