नाशिक मध्ये गरीबांचा फ्रीज महागला

नाशिक मध्ये गरीबांचा फ्रीज महागला

नाशिक : गरीबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठांना वाढत्या उन्हामुळे चांगलीच मागणी वाढली आहे. माठाच्या आकारानुसार १००  ते २००  रुपयांनी किंमत वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेसह ग्राहकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.उन्हाळा सुरू होताच माठाच्या मागणीत वाढ होते. लाल माती व काळ्या मातीपासून बनवण्यात आलेले माठ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले जातात.

यंदा माठांच्या मागणीसोबतच त्यांची किंमतही वाढली आहे. यावेळी कोळसा, भुसा व मातीचे भाव वाढल्याने माठांचे भाव वाढल्याचे विक्रेते सांगतात. त्यामुळे यंदा माठाच्या किंमतीत २०  ते २५  टक्के वाढ झालेली दिसून येते.मातीच्या माठातील पाणी हे नैसर्गिकरीत्या थंड होते. फ्रीजच्या थंडगार पाण्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. मात्र, ते लवकर गार होत असल्याने अशा पाण्याचाच अधिक वापर होतो.

असे असले तरी फ्रीज खरेदी करण्याची ज्यांची परिस्थिती नाही, ते उन्हाळ्यात आवर्जून माठ खरेदी करतात. नाशिकच्या मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी, औरंगाबाद रोड, पाथर्डी फाटा, मखमलाबाद, नाशिकरोड देवळाली या भागात मातीचे रंगबिरंगी माठ विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. या माठांना शहराच्या उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्या कॉलेज रोड, गंगापूर रोड भागातूनही मोठी मागणी असल्याचे दिसून येते.

First Published on: March 28, 2022 9:25 AM
Exit mobile version