माथाडी कामगारांच्या संपामुळे कांदा-बटाटा मार्केटचा व्यवहार ठप्प

माथाडी कामगारांच्या संपामुळे कांदा-बटाटा मार्केटचा व्यवहार ठप्प

नाशिक : माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंद मध्ये पंचवटीतील शरदचंद्रजी पवार मार्केट मधील हमाल, मापारी सहभागी झाले. पूर्ण करा पूर्ण करा हमाल माथाडी कामगारांच्या मागण्या पूर्ण करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, बंदमुळे शेतकर्‍यांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.

राज्य शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती यादीच यावेळी वाचून दाखविण्यात आली.माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडे प्रलंबित आहेत.माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व पुनर्रचित सल्लागार समितीवर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणुन नेमणुक करणे.माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दुर करणे साठी विशेष समिती गठीत करणे.माथाडीवर दहशत करणा-या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी समिती गठीत करावी.विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे.शासनाने २००८ मध्ये लेव्ही बाबत आदेशित केले होते. २००८ ते २०२२ पर्यंत थकीत लेव्हीं रक्कम मिळावी.शासन निर्णयानुसार खाजगी बाजार समितीमध्ये नोंदणीकृत परवानेधारक माथाडीना काम मिळावे.बाजार समितीमध्ये राजिनामा दिलेल्या माथाडी व मापारी कामगारांच्या जागी नवीन कामगारास बाजार समितीचा परवाना घेणेबाबत येणा-या अडचणींची सोडवणुक व्हावी, या स्वरूपाच्या मागण्या आहेत. या संपात प्रकाश जगदाळे,रामचंद्र लाडे, संदीप लोखंडे, सुभाष इंगळे, सलीम शेख, राजू चोथे, शंकर कनकुसे ,संजय जाधव, दत्ता आघाव, रवींद्र सोनवणे, सुनील थोरे आदी हमाल मापारी सहभागी झाले होते.

कृषि उत्पन्न बाजार समितीत नाशिक, दिंडोरी, सिन्नर, निफाड तालुक्यातील तसेच म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद, नांदूर – मानुर दसक – पचक आदी भागांतून कांद्याची आवक होत असते. सर्व साधारणपणे ऐंशी ते एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. : अरुण काळे, सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, नाशिक

शासन निर्मित महामंडळ कर्मचारी नाहीत, आमचे पगार पाच तारखे ऐवजी उशीरा होतात.आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोर्चे काढू हा एक दिवसीय लाक्षणिक संप होता, यापुढे बेमुदत संपावर जाऊ. तरी देखील शासनाने मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या. : सुनील यादव , जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि)

First Published on: February 1, 2023 7:45 PM
Exit mobile version