सेंट फ्रान्सिस शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका

सेंट फ्रान्सिस शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका

नाशिक : कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु असताना शाळेचे शुल्क भरले नाही म्हणून 17 विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला अडवणार्‍या सेंट फ्रान्सिस हायस्लूलला पालकांनी दणका दिला आहे. पालकांच्या मोर्चानंतर विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व दाखले पाच दिवसांच्या आत देण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्रनाथ कदम यांनी दिले.

नाशिक पॅरेट्स असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांच्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा व पालकांची शुक्रवारी (दि.22) एकत्रितपणे सुनावणी घेतली. यावेळी पालकांनी शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रारी केल्या. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षण सुरु असताना शाळेने शंभर टक्के शुल्क आकारणीचा आग्रह धरला. तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना 15 टक्के शुल्क सवलत दिल्याचे सांगितले. तरी उर्वरित शुल्क पालक भरत नसल्याची बाजू मांडली. परंतु, नीलेश साळुंखे यांनी मुख्याध्यापकांची नियुक्तीच बेकायदा असल्याचे सांगत शाळेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. बेकायदा शुल्कवसुली करणे ही एकप्रकारे खंडणीच असल्याचे त्यांनी सांगितले.

अखेर शिक्षणाधिकारी डॉ.कदम यांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्वांना दाखले देण्याचे आदेश दिले. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, जय महेश गुजर, द्विश्टी ओमप्रकाश तेजवाणी, निहारिका वाघ, विवेक जयसिंग शिरनाथ, प्रतिक बाळू भोर, प्रशांत बाळकृष्ण येवले, आर्यन राजेंद्र खैरनार, अरमान फिरोज पटेल, करन रियाज पठाण, सोहिल मुश्ताक शेख, कशफ अलिलस पठाण, सिध्दी मंदार सोनवणे, अहाद अकिल सिमना, आदित्य नितीन पाटील, अदनान इलियास खान, अमान इलियास खान, अयान इलियास खान या 17 विद्यार्थ्यांची शाळेने अडवणूक केली आहे. त्यांना पाच दिवसांच्या आत शाळा सोडल्याचे दाखले देण्याच्या आदेशाचे पालन होणार की शाळा पुन्हा मनमानी करणार याकडे पालकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागल्याने पालकांनी नीलेश साळुंखे यांचे आभार मानले.

First Published on: July 23, 2022 1:56 PM
Exit mobile version