एकनाथ शिंदेंनी घेतली ‘मुक्त’ची आभासी पदवी

एकनाथ शिंदेंनी घेतली ‘मुक्त’ची आभासी पदवी

ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 26वा दीक्षांत सोहळा मंगळवारी (दि.2) ऑनलाईन पध्दतीने पार पडला. विशेष म्हणजे या सोहळ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी पध्दतीने ऑनलाईन डिग्री प्राप्त केली. त्यांच्यासह तीन विद्यार्थांना विद्यापीठाने आभासी स्वरुपात पदवी प्रदान केली. आभासी पध्दतीने पदवी प्रदान करणारे मुक्त विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. यात वर्षभरात कोरोनामुळे उदभवलेल्या अडचणींचा सामना करत विद्यापीठाने एक लाख 91 हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेतली. तसेच 10 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले. विद्यापीठ अनुदान आयोगाने 12 नवीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून, येत्या शैक्षणिक वर्षात त्यांची सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रिदवाक्य घेवून दुरस्त शिक्षण पध्दतीचा प्रसार करणारे मुक्त विद्यापीठाचे कार्य हे आत्मनिर्भर भारताला बळ देणारे आहे.

कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे पारंपारिक विद्यापीठं आणि मुक्त विद्यापीठासारखे दुरस्त शिक्षण देणारे विद्यापीठं एका समान पातळीवर आले आहे. भविष्याचा वेध घेणारे हे विद्यापीठ विद्यार्थ्यांंना घरापर्यंत शिक्षण पोहोचवत आहे. ‘ज्ञानगंगा सतत’ प्रवाही ठेवणारे हे विद्यापीठ जगातील सर्वेश्रेष्ठ विद्यापीठ ठरेल, असा विश्वास कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ.दिनेश भोंडे विद्यापीठातील विद्याशाखांचे प्रमुख, विद्यार्थी सहभागी झाले.

First Published on: March 2, 2021 1:25 PM
Exit mobile version