युतीनंतरही वैचारिक मतभेद कायम

युतीनंतरही वैचारिक मतभेद कायम

उपस्थितांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे

नाशिक वैयक्तिक कारणास्तव भाजपबरोबर भांडत नव्हतो. तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आक्रमक होतो. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आणि मजबूत सरकारसाठी पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. युती झाली म्हणजे आमचे वैचारिक मतभेद संपले असा त्याचा अर्थ होत नाही. भविष्यात जनतेच्या हिताविरोधात काही घडत आहे, असे आम्हाला वाटल्यास आम्ही पुन्हा जायला मागेपुढे पाहणार नाहीत. नोटाबंदीला आमचा विरोध होता आणि अजुनही आहे. कारण त्याचा फायदा कोणालाही झाला नाही. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हजारो युवकांच्या समुदयासमोर आपल्या हटके शैलीत आत्मविश्वासाने बोलत होते. नाशिक येथे व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात रविवारी, ७ एप्रिलला हा आदित्य संवाद रंगला.

संयमी व परिपक्व उत्तरांनी आदित्य यांनी नाशिककरांची मने जिंकली. यावेळी तरुणांकडून येणार्‍या प्रत्येक प्रश्नाला संयमी आणि अभ्यासपूर्ण उत्तरे त्यांनी दिली. तरुणांकडून येणारे प्रश्न, नाशिकचे स्थानिक प्रश्न याचा परिपूर्ण अभ्यास करून संपूर्ण तयारीनिशी ते आले होते ते त्यांच्या देहबोलीवरून दिसून आले. मी २८ वर्षांचा आहे. मलाही काही प्रश्न आहेत. त्यामुळे युवकांचे प्रश्न जाणून घेण्याकरता मी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

ओमकार रोकडे : तुम्ही भाजपच्या विरोधात पाच वर्ष लढले. आता युती का केले?

उत्तर : भाजप बरोबरचे वैचारिक मतभेद हे वैयक्तिक प्रश्नांसाठी नव्हते, तर जनतेच्या प्रश्नांसाठी होते. शेतकरी आत्महत्या, कर्जमुक्ती, पीक विमा योजना, अयोध्येत राममंदिर केव्हा उभे राहणार या प्रश्नांची उत्तरे घेऊनच आम्ही युती केलेली आहे. युती झाली म्हणजे आमचे वैचारिक मतभेद संपले असा त्याचा अर्थ होत नाही. नोटाबंदीला आमचा विरोध होता आणि अजूनही आहे. कारण त्याचा फायदा कोणालाही झाला नाही. भाजपबरोबर आम्ही जनतेच्या प्रश्नावर भांडत होतो. देशाच्या ऐक्यासाठी ही युती आहे. देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार मिळावे. यापुढेही वेळ पडल्यास भाजपशी भांडायला मागे पुढे पाहणार नाही.

नीलेश राणे : ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडांगणे, साहित्य नाही

उत्तर : देश क्रीडामय झाला आहे. लवकरच वर्ल्ड कप बघणार आहोत. देशातील बदल बघितला तर सर्व क्रिकेटपटू मुंबईतील होते. आता देशातल्या वेगवेगळया भागातून येतात. या खेळाडूंना शाळेकडे आणणे गरजेचं आहे. खेळांत मुलांप्रमाणेच मुलींनाही संधी मिळायला हवी.

सायली निकम : नाशिकच्या उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागणार का ?

उत्तर : निश्चितपणे उपकेंद्र झाले पाहिजे. पुढच्या काही महिन्यात नाशिकमध्येही उपकेंद्राचा मुद्दा मार्गी लावू. खासदारांचे कुलसचिवांशी चर्चा झाली आहे. या वर्षात हा प्रश्न मार्गी लावू.

प्रश्न : राज्याविषयी तुमचे व्हीजन काय?

उत्तर : राज्यात तरुणांची संख्या मोठी आहे. यात रोजगाराचा प्रश्न सर्वात मोठा आहे. उद्योग येत नाही म्हणून रोजगार नाही हा समज चुकीचा नाही. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय हे खरे आहे, पण मुळात अभ्यासक्रमात बदल करावा लागेल. टोनी ब्लेअर पंतप्रधान होणार होते, तेव्हा त्यांनी शिक्षणाला सर्वात महत्व दिले.

खेळाडूंचा सत्कार

यावेळी जलतरणपटू श्रेयस व्दिवेदी, तलवारबाजी आनंद करीवडेकर, रोईंग स्पोर्टस पुजा जाधव, कुस्तीपटू वैशाली आहिरे, सामाजिक कार्यकर्ता ज्योती वाकचौरे, योगेश निकम या खेळाडूंचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना आदित्य संवाद या कार्यक्रमाची टोपी दिली.

First Published on: April 7, 2019 10:24 PM
Exit mobile version