निस्सीम भक्तीचे मूर्तीमंत उदाहण

निस्सीम भक्तीचे मूर्तीमंत उदाहण

काम- चहा वाटपाचे.. मासिक उत्पन्न- चार ते पाच हजार रुपये… छंद-गणेशोत्सव काळात कलात्मक गणपती तयार करणे.. बाप्पाच्या निस्सीम भक्तीला आर्थिक परिस्थितीची किनार नसते असे म्हटले जाते. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे किशोर निकुंभ अर्थात नाना! नानाने यंदा मुरमुरे आणि दाळींपासून गणपतीची मूर्ती साकारली आहे.

कालिदास कलामंदिरात दरवर्षी लक्षवेधी मूर्ती साकारली जाते. चहाचे ग्लास, वर्तमानपत्र, बॉल्स, चिंध्या, इंजेक्शनच्या बाटल्या, आगपेटी, काडीपेटी, सलाईनच्या बाटल्या, खराटे, आरशाच्या काचा, कापूस अशा विविध सामुग्रीपासून आकर्षक बाप्पा साकारण्याचे काम किशोर करतो. त्यासाठी तो वर्षभर कष्ट करुन पैशांची बचत करतो. जी बचत होते, त्यातून ही आकर्षक मूर्ती साकारली जाते. कालिदास कलामंदिरात नाटकांसाठी येणार्‍या कलावंतांनाही या बाप्पाची ओढ लागते. या कलावंताच्या कौतूकाची थाप हीच नानाची कमाई. यंदा नानाने कुरमुरे आणि वेगवेगळ्या दाळंपासून गणपतीची मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचे प्रसिध्द अभिनेता अशोक सराफ, निर्मिती सावंत, विजय पाटकर, संजय नार्वेकर यांनी मनभरुन कौतूक केले.

बाप्पावरच्या भक्तीपोटीच हे काम 

मी कालिदास कलामंदिराच्या कॅन्टीनमध्ये चहा वाटपाचे काम करतो. लहानपणापासूनच मला मूर्तीकामाची आवड होती. वेगवेगळ्या सामुग्रीपासून मूर्ती तयार झाल्यावर मी ती शालीमार चौकातील जयबजरंग मित्रमंडळाकडे ती सपूर्द करतो. मंडळाचे पदाधिकारी त्याबदल्यात मला थोडेफार आर्थिक सहाय्यही करतात. पण मी बाप्पावरच्या भक्तीपोटीच हे काम करतो. आर्थिक मदतीची मला अपेक्षा नसते.  – किशोर निकुंभ, मूर्तीकार

First Published on: September 2, 2019 11:56 PM
Exit mobile version