ओझर विमातळाचा लवकरच विस्तार

ओझर विमातळाचा लवकरच विस्तार

नाशिक : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने नाशिक विमानतळावर सध्याच्या धावपट्टीच्या समांतर एक नवीन धावपट्टीची योजना आखली आहे. ज्यामुळे ऑपरेशनल क्षमता वाढून भविष्यात शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन विमान वाहतुकीची गरज पूर्ण होईल, या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेले ओझर विमानतळ खुले करण्यात आले आहे. या दरम्यान विमानसेवा बंद करण्यात आली होती. यावर उपाय म्हणून आता नाशिक ओझर विमानतळावर नवी धावपट्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचे काम सुरु असल्याचे समजते. केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) नाशिक विमानतळावरील इमिग्रेशन सुविधा हाताळण्यासाठी संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या एचएएलला यापूर्वीच मान्यता दिली आहे. यामुळे ओझर विमानतळावरून भविष्यात कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्यास सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.

यासाठी नाशिकहून देशांतर्गत मार्गांवर अधिक विमान कंपन्यांना आकर्षित करण्यासाठीही आगामी काळात अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी नाशिक विमानतळावरील धावपट्टी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे सुमारे दोन आठवडे कामकाजासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत नाशिकहून विमानसेवा झाली नाही. या पार्श्वभूमीवर दुसरी धावपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक धावपट्टी बंद असली तर दुसर्‍या धावपट्टीवरून विमानसेवा सुरु राहील, असा ओझर एअरपोर्ट प्रशासनाचा उद्देश आहे.

First Published on: December 10, 2022 10:21 AM
Exit mobile version