कोट्यवधी रुपये खर्चूनही नेहरू उद्यानाचा वनवास कायम

कोट्यवधी रुपये खर्चूनही नेहरू उद्यानाचा वनवास कायम

स्वप्निल येवले । पंचवटी
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून कोट्यवधी रुपये खर्चून नेहरू उद्यानाचा पुनर्विकास करण्यात आला. त्यामुळे हे उद्यान स्मार्ट बनेल अशी भाबडी अपेक्षा नाशिककरांना होती. प्रत्यक्षात मात्र, एवढा अमाप खर्च होऊनही या उद्यानात साधा झोका किंवा घसरगुंडीही बसविलेली नाही. अतिक्रमणांचा फास लागलेल्या या उद्यानाचा श्वास महापालिका आयुक्तांनी मोकळा करावा व त्याचे पुनर्वैभव परत मिळवून द्यावे, अशी मागणी आता नाशिककरांकडून केली जाते आहे.

स्मार्ट सिटी कंपनीने जवळपास कोट्यवधी रुपये खर्चून नेहरू उद्यान विकसित केले. मात्र, अजूनही हे उद्यान नाशिककरांसाठी खुले केले गेलेले नाही. असे असेल तर उद्यान विकासाच्या नावाखाली केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च ठेकेदारासाठी होता की काय, असा संतप्त सवालही नागरिकांकडून केला जातो आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे शहरातील सर्व उद्याने बंद होती. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतरदेखील शहरातील अनेक उद्याने खुली झाली नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुट्या लागल्या असल्याने पालक आणि मुलांकडून उद्यान खुले होण्याची प्रतिक्षा होती.

गेल्या महिन्यात महानगरपालिकेने शहरातील अनेक छोटी मोठी उद्याने खुली केली असली, तरी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले नेहरू उद्यान अजूनही बंद आहे. त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या उद्यानावर कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी हिरवळ (लॉन्स) सोडले तर मुलांना खेळण्यासाठी कोणतीही खेळणी उद्यानात बसवलेली दिसत नाही. पूर्वी या उद्यानात अ‍ॅम्फिथिएटरसह लहान मुलांसाठी रेल्वे गाडी होती. आजही उद्यानाचे क्षेत्र पूर्वी होते तेवढेच आहे. त्यामुळे पुनर्विकासानंतर त्यात अत्याधुनिक खेळणी किंवा इतर मनोरंजनात्मक संकल्पना येतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात हिरवळ आणि काही कारंजे सोडले तर काहीच दिसून येत नाही. उद्यान विकासाचे काम ज्या ठेकेदाराने केले त्याच्याकडेच देखभाल दुरुस्तीचे काम होते. हे उद्यान आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. हे करताना काही किरकोळ दुरुस्तीचे कामही ठेकेदाराने केले नाही. ते काम आता महापालिकेच्या उद्यान विभागाने करून घेत त्याचे बिल स्मार्ट सिटीकडे द्यावे. स्मार्ट सिटी कंपनी ठेकेदाराच्या सुरक्षा अनामत रकमेतून ते बिल अदा करणार असल्याचे स्मार्ट सिटीचे नीलेश बरडे यांनी सांगितले.

अतिक्रमणांपुढे पालिका प्रशासन हतबल

कधीकाळी नाशिकचे वैभव असलेल्या नेहरू उद्यान आणि शिवाजी महाराज उद्यान ही दोन्हीही ठिकाणे आता पालिकेच्या कर्मदारिद्य्रापायी नाशिककरांच्या विस्मरणात गेली आहेत. नेहरू उद्यानाला अनेक वर्षांपासून खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा फास पडलेला आहे. राजकीय वरदहस्त आणि महापालिकेच्या बोटचेपे धोरणामुळे ही समस्या एकदाही सुटलेली नाही. अतिक्रमणाची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने उद्यानाच्या संरक्षक भितींच्या रचनेत मोठा बदल केला मात्र तरीही प्रश्न सुटला नाही. या अतिक्रमणांमुळे उद्यानासह पार्किंगचीही वाट लागली आहे.

उद्यान विभागाचा कारभार चव्हाट्यावर

दोन वर्षे कोरोनामुळे उद्याने बंद होती. आता १५ दिवसांनी पावसाळा सुरु झाला की पुन्हा उद्याने चार ते सहा महिने बंद राहतील. उद्यान विभाग नेमके काय काम करतो, हा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. महत्त्वाचा असूनही या विभागाला पूर्णवेळ उपायुक्त नाही. इतर जागाही रिक्त आहेत.

First Published on: May 23, 2022 12:50 PM
Exit mobile version